शरद पवारांच्या बालेकिल्याच्या भाजपकडून ठिकऱ्या, धूळधाण; मंत्री चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:47 IST2025-02-17T18:45:18+5:302025-02-17T18:47:59+5:30
कितीही काळी जादू करू देत, पाच वर्षे मजबूत

शरद पवारांच्या बालेकिल्याच्या भाजपकडून ठिकऱ्या, धूळधाण; मंत्री चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक महायुतीचे आमदार निवडून आल्याने शरद पवार, काँग्रेस, शेकापच्या बालेकिल्यांची ठिकऱ्या, ठिकऱ्या उडून धूळधाण झाली आहे, अशी बोचरी टीका उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली.
भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील संघटन पर्व कार्यशाळेत ते बोलत होते. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. महासैनिक दरबार हॉलमध्ये कार्यशाळा झाली.
मंत्री पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण विभागात भाजपचे संघटन चांगले झाले आहे. संघटन देवाऱ्यात पुजण्यासाठी नाही तर निवडणूूक जिंकण्यासाठी वापर केला पाहिजे. मजबूत संघटनेमुळेच भाजपला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात चांगले यश मिळाले आहे. म्हणून विशेष कार्यकारी अधिकारी पदे भाजपच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त दिली.
जिल्ह्यात २९ शासकीय समित्या, तर राज्यात महामंडळावर निवडी आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या अशासकीय सदस्य निवडणुकीतही कार्यकर्त्यांना संधी मिळेल. कै. सुभाष वोरा यांना आम्ही अंथरुणात खिळून असतानाही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सदस्य करून जुन्या कार्यकर्त्यांची दखल पक्ष घेतो असा संदेश दिला होता. अशाच पद्धतीने यापुढेही पक्षातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना शोधून पदे द्या.
कितीही काळी जादू करू देत, पाच वर्षे मजबूत
सरकारवर कितीही काळी जादू करू दे. भाजपचे तब्बल १३७ आमदार आहेत. त्यामुळे पाच वर्षे सरकार मजबूत राहील, असा विश्वास मंत्री पाटील यांनी कार्यशाळेत व्यक्त केला.
भाजपकडून लढणाऱ्यांनाच जास्त निधी..
मंत्री पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीमधील निधी आधीच्या पालकमंत्र्यांनी घासून, पुसून स्वच्छ केला आहे. एक एप्रिलनंतर भरीव निधी मिळेल. नवीन निधीतील सर्वांत जास्त निधी आगामी काळातील जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून लढू इच्छिणाऱ्यांना द्यावा.
जिल्हा रिकामा होईल..
जिल्हयातील इतर पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्यांची यादी खासदार धनंजय महाडिक यांनी माझ्याकडे दिली. ती यादी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंजूर करून घेतली आहे. आगामी काळात या सर्वांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तर जिल्हा रिकामा होईल, असा टोलाही मंत्री पाटील यांनी लगावला.
त्यांना कळेल अशा भाषेत..
माझ्या कोथरूड मतदारसंघात कमी सभासद नोंदणी केलेल्या कार्यकर्त्यांना मी स्वत: संपर्क साधून त्यांना कळेल अशा भाषेत समजावणार आहे. सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करा आणि मगच माझ्या घरी चहा पिण्यासाठी या, असेही त्यांना सुनावणार आहे, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.