Kolhapur: मोक्कातील आरोपीची जंगी मिरवणूक, दुधाने घातली आंघोळ, व्हिडिओ व्हायरल; सातजणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:00 IST2025-01-08T11:59:55+5:302025-01-08T12:00:27+5:30
चौघांना अटक : नागाळा पार्कातील टोळीचा प्रताप

Kolhapur: मोक्कातील आरोपीची जंगी मिरवणूक, दुधाने घातली आंघोळ, व्हिडिओ व्हायरल; सातजणांवर गुन्हा
कोल्हापूर : मोक्कांतर्गत कारवाई झालेला गुन्हेगार अनिकेत अमर सूर्यवंशी (वय २१, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) हा कळंबा कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणुकीने त्याचे स्वागत करणाऱ्या आणि त्याचे रिल्स सोशल मीडियातून व्हायरल करणाऱ्या सातजणांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील सहाजणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एक कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या. मिरवणुकीचा प्रकार २४ डिसेंबरला घडला, तर सोमवारी (दि. ६) सकाळी त्यांनी आर. एस. कंपनी १२५ या इन्स्टा अकाऊंटवरून रिल्स व्हायरल केले.
याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत अमर सूर्यवंशी (वय २१), गब्बर ऊर्फ आदित्य अमर सूर्यवंशी (२५, दोघे रा. केव्हीज पार्क, नागाळा पार्क), अनुराग दिलीप राखपसारे (२०, रा. शाहूपुरी), करण ऊर्फ तुषार सिद्धू कुमठे (२२, रा. विचारे माळ, सदर बाजार), सागर कैलास गौडदाब (३४, रा. गणेश पार्क, कदमवाडी), प्रथमेश कुमार समुद्रे (२०, रा. सदर बाजार) आणि वेदांग शिवराज पोवार (२०, रा. बिंदू चौक, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. यातील गब्बर सूर्यवंशी, प्रथमेश समुद्रे आणि वेदांग पोवार वगळता इतरांना अटक झाली.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दमदाटी, मारामारी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात नागाळा पार्कातील सूर्यवंशी टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. २०२१ पासून टोळी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. यातील गब्बर ऊर्फ आदित्य सूर्यवंशी याची वर्षभरापूर्वी सुटका झाली. अनिकेत सूर्यवंशी याची २४ डिसेंबरला सुटका झाली. त्याचे नातेवाईक आणि समर्थकांनी कळंबा कारागृहापासून ते केव्हिज पार्कपर्यंत मिरवणूक काढून त्याचे स्वागत केले. घरातही रांगोळ्या घालून स्वागत झाले. समर्थकांनी याचे व्हिडीओ आर. एस. कंपनी १२५ या इन्स्टा अकाऊंटवरून व्हायरल करताच हा प्रकार पोलिसांच्या नजरेत आला. गुन्हेगारीचे उदात्तीकरण होत असल्याने पोलिसांनी तातडीने सातजणांवर गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.
फुलांच्या रांगोळ्या अन् दुधाचा अभिषेक
अनिकेत सूर्यवंशी याचे नातेवाइकांनी जोरदार स्वागत केले. दारात मंडप घालून फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. घरी येताच त्याला खुर्चीत बसवून दुधाचा अभिषेक घातला. औक्षण करून त्याला घरात घेतले. याचे व्हिडीओ व्हायरल करून टोळी पुन्हा दबदबा वाढविण्याचा प्रयत्न करीत होती.
पोलिसांचा इशारा
रिल्समधून विरोधी टोळ्यांना चिथावणी देणे, आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करणे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिला.