मायलेक- भाग ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:27 AM2021-09-23T04:27:30+5:302021-09-23T04:27:30+5:30

तिच्या मायला तिने मरणाच्या दाढेतून बाहेर काढले. तुळशीला तर रमा आता चोवीस तास डाेळ्यासमोर लागत होती. रमा तर तिचा ...

Milek - Part 3 | मायलेक- भाग ३

मायलेक- भाग ३

googlenewsNext

तिच्या मायला तिने मरणाच्या दाढेतून बाहेर काढले. तुळशीला तर रमा आता चोवीस तास डाेळ्यासमोर लागत होती. रमा तर तिचा आता श्वास होता - प्राण होता - माझी रमा - रमा - बाय म्हणत ती जेवायची... घरातल्या घरात फिरायला लागलेली. तुळशी आत. उत्साहाच्या, आनंदाच्या झुल्यावर डोलू लागलेली. तुळशी. काबाडकष्ट करूत. उन्हातान्हाने करपलेली काया. सावळासा कष्टाळू चेहरा माझ्या डोळ्यांसमोर अजूनही तरळतो.

संध्याकाळचा वेळ जात नव्हता म्हणून सहज टीव्ही लावला, तर बातम्यांत तुळशीची मुलाखत चाललेली. सगळे डॉक्टर्स बसलेले - नि मुलाखत घेणारी - अँकर.. मॅडम तिला विचारत होती, तुळशी... ताई.. आता तुम्ही एवढ्या असाध्या आजारावर मात केली - नवीन टेक्नॉलॉजीने... प्लाझ्मा थेअरीने तुम्ही रोगावर मात केलीत.. याचे श्रेय तुम्ही कोणाला देता - तुमची प्रबळ इच्छाशक्तीचेपण मी कौतुक करते तर.. आम्हाला... तुमच्याच तोंडून ऐकायचंय...

आता तुळशीताई बोलताहेत - तुळशीच्या हाती माईक आला - माझे कान आतुरलेले. तिचा एकेक शब्द कानी पडत होता. प्रथमच माईक हातात आल्याने गोंधळलेल्या हाताला ‘हं.. हं... करीत आवंढा गिळत, डोळ्यांतील पाणी पदराने पुसत जड मनाने ती बोलत होती. माझी रमा.. रमा.. म्हणताना परत तुळशीचे डोळे भरून आले. रमाने मला जीवदान दिले आहे. आज मी इथे तुमच्यासमोर बोलत आहे, ते तिच्यामुळेच. माझी रमा ही मुलगी नसून माझा मोठा आधार आहे जगण्याचा ऑक्सिजन की काय तो प्राणवायूच हो. रमाने लहानपणापासूनच सगळ्या बिकट परिस्थितीवर मात करून शिक्षणात-खेळात स्थान प्राप्त केले आहे. स्वत:च्या मेहनतीवर उच्च शिक्षण घेत- गरुडझेप घेतलीय - आता माझा जावईही तिच्यासोबत मला सांभाळत आहे. हल्लीच्या नवीन पद्धतीने काय त्या टे-क्ना-ने (टेक्नॉलॉजीने)... प्- प्ला (प्लाझ्माने) मला पुनर्जन्मच लाभलाय. सर्व श्रेय रमाला आहे. खरोखर मुलगी ही घराघरात उजळणारी पणती होय. वंशाचा दिवा. वंशाचा दिवा करीत.. कित्येक घरात.. आया-बाबा कौतुक करीत असतात. मुलगा-मुलगा म्हणत राहतात. मुलगा होण्यासाठी बायका नवस, उपवास करतात नि झाल्यावर पेढ्यांचा ढिगारा आणून वाटतात. काय ते लाड-कौतुक. मग, मुलगा शिकायला परदेशात गेला की, त्याला मायभूमीबरोबर स्वत:च्या जन्मदात्रीचाही विसर पडतो. नोटांची बंडले खिशात आल्याने माजलेल्या मस्त मुलांना म्हाताऱ्या आई-वडिलांची घरात अडगळ वाटते अन् मग ते चक्क त्यांना अनाथाश्रमात टाकून पैशाची पाकिटं त्यांच्यापुढे फेकून निघून जातात. बड्या-बड्या कंपनीत, परदेशात स्थायिक होतात. अशी कित्येक घरं मी पाहिलीत त्या... आई-वडील वृद्धाश्रमात किंवा घरात एकटेपणात... मुलाच्या फोनची - पत्राची आतुरतेने वाट पाहत असतात म्हणण्यापेक्षा तळमळत असतात. बोलत असताना तुळशीने पुन्हा एकदा डोळे पुसले. काळोखात मिणमिणत.. उजळत राहते...उजळत प्रकाशात ठेवते.. घरातला... माहेरच्या नि सासरच्या दोन्ही कुटुंबांना...

आणि कितीतरी वेळ बोलत राहिलेली तुळशी डॉक्टरांच्या टीमचे- त्यांच्या कुशल बुद्धीचे नवीन - पद्धतीचे - चिकित्सा - टेक्नॉलॉजीचे आभार मानून तुळशी गप्प गप्प बसून राहिली.

तुळशीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे असीम समाधान, स्मित झळकत राहिलं. तिने आयुष्याची इतकी वर्षे काबाडकष्ट करून संसार तग धरून ठेवला होता - तिच्या सवतीच्या मुलीला वाढविले. दोघीही एकमेकींना आधार होऊन राहिल्या. पाणावलेल्या डोळ्यांना पुसत तुळशी उठताच - तिला आधार देऊन.. हातात हात घेतलेल्या रमाकडे बघताना कौतुक ओसंडत होतं.

- मानसी जामसांडेकर,

अनंत प्राइड, हनुमाननगर ‘बी’, पाचगाव रोड, कोल्हापूर-४१६००७

मोबा. : ८३९०९३२४८३

Web Title: Milek - Part 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.