सत्तारूढ गटाने सभा चालवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:27+5:302021-02-05T06:57:27+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये गेल्या वर्षभरात केलेल्या कारभाराबाबत सभासदांचे काही प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे देऊन संचालक मंडळाने ...

Meetings should be held by the ruling party | सत्तारूढ गटाने सभा चालवावी

सत्तारूढ गटाने सभा चालवावी

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये गेल्या वर्षभरात केलेल्या कारभाराबाबत सभासदांचे काही प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे देऊन संचालक मंडळाने सभा शांततेत चालवावी, अशी आमची अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वीची ही सभा असल्याने आता थांबायचे नाही, असे आदेश नेत्यांनी दिल्याने ताकदीने सभेला उपस्थित राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. ‘गोकुळ’ची सभा बुधवारी (दि. ३) दुपारी एक वाजता संघाच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखाना कार्यस्थळावर होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी गटाची सोमवारी अजिंक्यतारा येथे बैठक आयोजित केली होती, त्यामध्ये ए. वाय. पाटील बोलत होते.

हमीदवाडा साखर कारखान्याचे संचालक विरेंद्र मंडलिक म्हणाले, कागल तालुक्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादक सभासद प्रतिनिधींना या सभेला उपस्थित ठेवण्याची जबाबदारी मी व नवीद मुश्रीफ घेत आहोत. लोकसभा व विधानसभेला आम्ही जनतेच्या पाठबळावर विजय मिळवला आहे. आता ‘आमचं ठरलंय, गोकुळ उरलंय’ ही खूणगाठ बांधून काहीही करुन गोकुळ जिंकल्याशिवाय आता स्वस्थ बसायचं नाही, असा निर्धार करूया.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, सभेला ताकदीने उपस्थित राहून सत्ताधारी गटाच्या भ्रष्टाचारी कारभाराचा पोलखोल करण्याचे आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. त्यानुसार दूध संस्था प्रतिनिधींनी तयारीने यावे.

‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले म्हणाले, सत्ताधारी गटाने भरमसाठ खर्च केल्याने दुधाला कमी दर दिला आहे. त्यामुळे यावर्षी दूध उत्पादकांचा ७६ कोटींचा तोटा झाला आहे. ‘शेकाप’चे बाबासाहेब देवकर म्हणाले, गरज नसताना सत्तारूढ गटाने विस्तारीकरण केल्याने दूध उत्पादकांवर शंभर कोटींचा भुर्दंड बसला आहे.

या बैठकीला संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, कर्णसिंह गायकवाड, रमादेवी बोंद्रे, बाळासाहेब कुपेकर, प्रा. किसन चौगले, ‘कुंभी’चे संचालक किशोर पाटील, जनसुराज्य’चे प्रा. बाबासाहेब शिंदे, प्रा. सुनील शिंत्रे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : ‘गोकुळ’च्या उद्या (बुधवारी) होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विरोधी गटाची बैठक अजिंक्यतारा येथे झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दूध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (फोटो-०१०२२०२१-कोल-गोकुळ)

Web Title: Meetings should be held by the ruling party