कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत पुढील आठवड्यात बैठक, पालकमंत्र्यांचे राजू शेट्टींना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 17:21 IST2023-01-10T17:21:10+5:302023-01-10T17:21:39+5:30
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर कारवाई करून प्रदूषण मुक्तीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा

कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत पुढील आठवड्यात बैठक, पालकमंत्र्यांचे राजू शेट्टींना आश्वासन
कोल्हापूर : जिल्ह्यात पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला असून शासनाने तातडीची बैठक घेऊन याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सोमवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. पुढील आठवड्यात याबाबत मुंबईत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मंत्री केसरकर यांनी दिले.
संघटनेच्या वतीने अनेक वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणाबाबत सातत्याने आंदोलन व उपाययोजनांबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनही याबाबत सरकार गांभीर्याने घेत नाही. सध्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असून पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच पडत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथींचे आजार पसरण्याचा धोका आहे.
डिसेंबरनंतर नदीतील पाण्याचा विसर्ग कमी होतो आणि साखर कारखाने, कोल्हापूर महापालिका, शिरोली, हातकणंगले , इचलकरंजी औद्योगिक वसाहतीमधील पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांचे आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर कारवाई करून प्रदूषण मुक्तीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे शेट्टी यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सावकर मादनाईक, नगरसेवक शैलेश चौगुले आदी उपस्थित होते.