Kolhapur: श्रावणानिमित्त अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिर भाविकांसाठी खुले, वर्षातून तीन वेळा घेता येते दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:26 IST2025-07-29T13:16:29+5:302025-07-29T13:26:45+5:30
दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा

Kolhapur: श्रावणानिमित्त अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिर भाविकांसाठी खुले, वर्षातून तीन वेळा घेता येते दर्शन
कोल्हापूर : कोसळत्या श्रावणधारा, हिरवाईने नटलेल्या वसुंधरेची साथ, भक्तीने श्रद्धेने भोळ्या शंकराला साद घालत कोल्हापूरकरांनी पहिल्या श्रावण सोमवारी शिवशंकराच्या ओम नम: शिवायचा जाप केला. रुद्राभिषेक, बेल, पांढरे फुले, वस्त्रमाळ, धूप, दीप, आरती, भजन, कीर्तन, अशा धार्मिक विधींनी मंगलमयी वातावरणात ओम नम: शिवायचा जाप करण्यात आला. अंबाबाई मंदिरातील श्री मातृलिंग मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यावरील दुसऱ्या मजल्यात असणारे हे मातृलिंग मंदिर वर्षातून तीन वेळा खुले करण्यात येते. महाशिवरात्री, वैकुंठ चतुर्दशी आणि श्रावण सोमवारी या मंदिरात भाविकांना दर्शन घेता येते.
हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याला व्रतवैकल्यांचा, शिवशंकराच्या आराधनेचा महिना मानला जातो. प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलिंगाचे पूजन करून शिवमूठ म्हणून एक धान्य वाहिले जाते. कोल्हापूर हे शिवशक्तीचे स्थान असल्याने शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिवमंदिरे आहेत.
श्रावण सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांनी शिवलिंगाचे पूजन करून तांदूळ शिवमूठ वाहिले. इतरवेळी बंद ठेवले जात असलेले अंबाबाई मंदिराच्या वरच्या मजल्यावरील श्री मातृलिंग मंदिर श्रावण सोमवारी मात्र भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले. दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
मंगळवार पेठेतील श्री रावणेश्वर मंदिराला फुला-पानांची आकर्षक रोषणाई केली होती. ग्रामदैवत कपिलेश्वर मंदिर, अंबाबाई मंदिरातील अतिबलेश्वर, ऋणमुक्तेश्वर, वटेश्वर, उत्तरेश्वर, अशा सर्वच मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.