कोल्हापुरातील मटका बुकी सम्राट कोराणे अखेर अटकेत, तपासाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:29 IST2025-02-08T12:28:51+5:302025-02-08T12:29:43+5:30
समर्थकांची कळंबा कारागृहासमोर मोठी गर्दी

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : जिल्हा न्यायालयात शरण आलेला मटका बुकी सम्राट सुभाष कोराणे (वय ४२, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याचा ताबा राजारामपुरी पोलिसांकडे दिला आहे. दरम्यान कोराणे समर्थकांनी कळंबा कारागृहासमोर मोठी गर्दी केली होती. मोठ्या पोलिस बंदोबस्तात त्याला कळंबा कारागृहातून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय ते न्यायालयात नेण्यात आले.
कोराणे याचा ताबा मिळवण्यासाठी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी गुरुवारी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता कळंबा कारागृहातून कोराणे याचा ताबा घेतला. त्याचा ताबा घेताना समर्थकांनी कळंबा कारागृहासमोर मोठी गर्दी केली. पोलिसांनी ही गर्दी पांगविली. त्यानंतर त्याची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी केली. तेथून कसबा बावडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात मोठ्या पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्यासमोर त्याला हजर केले असता १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
यादवनगर येथील मटका अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी मटका बुकींची पाळेमुळे खणून काढली होती. एप्रिल १०१९ मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून मटका बुकी सम्राट कोराणे फरार होता. या गुन्ह्यातील ४४ पैकी ४२ संशयितांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोका) पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. फरार आरोपी कोराणे बुधवारी स्वत:हून न्यायालयात शरण आला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
रात्री उशिरापर्यंत तपास सुरू
कोराणेचा ताबा राजारामपुरी पोलिस ठाण्याकडे आहे. रात्री उशीरा तपास अधिकारी उपअधीक्षक अजित टिके यांनी कोराणे याच्याकडे तपास केला. गेली सहा वर्षे तो कुठे होता?, त्याला कोणी आश्रय दिला?, यात काही राजकीय व्यक्तींचा सहभाग होता काय?, त्याचे कोणाशी लागेबांधे होते?, याची माहिती घेतली जात आहे.