"शिवभक्त प्रविण गायकवाड, महाराष्ट्र तुमच्यासोबत", हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात एकवटला मराठा समाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:01 IST2025-07-14T16:00:21+5:302025-07-14T16:01:09+5:30
शिवाजी महाराजांची बदनामी यापूर्वी ज्यांनी ज्यांनी केली, त्यावेळी हे बेगडी शिवप्रेमी बिळात लपून बसले

"शिवभक्त प्रविण गायकवाड, महाराष्ट्र तुमच्यासोबत", हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात एकवटला मराठा समाज
कोल्हापूर : ''शिवभक्त प्रविण गायकवाड, महाराष्ट्र तुमच्यासोबत'' असे फलक हाती घेत हल्लेखोरांच्या विरोधात सोमवारी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत निदर्शने केली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनादरम्यान घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या कोल्हापुरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते एकवटले. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी चौक दणाणून गेला. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वसंत मुळीक, संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, शिवशाहीर दिलिप सावंत, राजमाता जिजाउ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष राहुल इंगवले, चंद्रकांत पाटील, राजू सावंत, हिंदूराव हुजरे-पाटील, शशिकांत पाटील यांची भाषणे झाली.
वसंत मुळीक म्हणाले, शिवाजी महाराजांची बदनामी यापूर्वी ज्यांनी ज्यांनी केली, त्यावेळी हे बेगडी शिवप्रेमी बिळात लपून बसले. हल्ला करणाऱ्या गुंडांवर तत्काळ कारवाई केली नाही तर मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
रुपेश पाटील म्हणाले, गायकवाड यांची बदनामी करण्यासाठीच हा हल्ला केला आहे. त्यांची तत्काळ चौकशी करावी, शिवशाहीर दिलिप सावंत म्हणाले, बहुजन जेव्हा जेव्हा उभे राहतो, तेव्हा तेव्हा ते न बघवणारे सनातनी पुढे येतात आणि अशाप्रकारे हल्ला करतात. त्यांच्यावर कारवाई करावी.
सुनीता पाटील म्हणाल्या, गायकवाड यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा खरा इतिहास पुढे आणला. त्यांचा विचार संपवण्यासाठी असे भ्याड हल्ले केले जातात, पण त्यांनी संभाजी ब्रिगेडला डिवचले आहे. त्यांच्या शेवटाची ही सुरुवात आहे.
निदर्शनात इंद्रजीत सावंत उमेश पोवार, बाळासाहेब पाटील, विकास जाधव, भगवान कोईगडे, अभिजीत कांजर, सुधा सरनाईक, शैलजा भोसले, जीवन बोडके, उमेश सूर्यवंशी, हिदायत मणेर, राजू मालेकर सहभागी झाले होते.