कारखानदारांचा १२ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:30+5:302021-08-27T04:27:30+5:30

मुंबई येथे शरद पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत वेतन कराराला कारखानदारांच हिरवा कंदील ५ सप्टेंबरच्या बैठकीत वेतन कराराच्या अंतिम ...

Manufacturers' proposal for 12 per cent pay hike | कारखानदारांचा १२ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव

कारखानदारांचा १२ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव

मुंबई येथे शरद पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत वेतन कराराला कारखानदारांच हिरवा कंदील

५ सप्टेंबरच्या बैठकीत वेतन कराराच्या अंतिम मुसद्यावर होणार शिक्कामोर्तब

प्रकाश पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे - गेली अडीच वर्षे राज्यातील साखर कामगारांचा वेतन करार रेंगाळला होता, पण शरद पवार यांनी या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी लक्ष घातल्याने साखर कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बुधवारी मुंबई येथे कारखानदारांची शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कारखानदारांनी १२ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. याचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे. ५ सप्टेंबरला होणाऱ्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याने वृत्त आहे.

राज्यातील साखर उद्योगात काम करणाऱ्या साखर कामगारांचा दर पाच वर्षाने वेतनवाढीसह इतर मागण्यांचा करार होतो. मागील वेतन कराराची मुदत मार्च २०१९ मध्ये संपलेली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात दोनवेळा आलेली कोरोनाची लाट व महापुराने साखर कामगारांच्या वेतन कराराला जवळपास ३० महिन्याचा कालावधी लोटला तरी गती मिळेना. म्हणून साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने शरद पवारांना यात लक्ष घालण्यासाठी साकडे घातले होते.

गेल्या महिन्यात साखर कारखानदारांनी ५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव दिला होता, पण त्याला राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाने विरोध केला होता. बुधवारी ( दि. २५) ऑगस्टला मुंबई येथील साखर संकुलात शरद पवार व कारखानदार यांच्यात झालेल्या बैठकीत १२ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव कारखानदारांनी ठेवला आहे. याचबरोबर इतर भत्त्यातही वाढ होणार असून ज्या साखर कामगारांची २१ वर्ष नोकरी झाली आहे, त्यांना ३ वेतनवाढ मिळणार आहेत. याबाबतचा मसुदा तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. ५ सप्टेंबरला होणाऱ्या वेतन मंडळाच्या त्रिपक्षीय बैठकीत याला अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता आहे. यामुळे साखर कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

चौकट

१)असे मिळणार फायदे --मूळ पगाराच्या १२ टक्के वेतनवाढ झाल्यास पगारात २१०० ते २६०० रुपये वाढ होणार आहे. २१ वर्षे सेवेत असणाऱ्यांना ३ वेतन वाढ मिळणार आहेत. त्याचबरोबर घरभाडे व धुलाई भत्त्यात वाढ होणार असून ३० महिन्यांचा फरक कारखान्यांना द्यावा लागणार आहे.

प्रतिक्रिया

गेली ३० महिने साखर कामगार वेतन करार रखडला आहे. आता साखर कारखानदारांनी १२ टक्के वेतनवाढीचा साखर कामगार नेते शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत प्रस्ताव ठेवल्याने आशावादी चित्र आहे. याचे स्वागत करूया.

सरदार पाटील ( कामगार प्रतिनिधी कुंभी-कासारी कारखाना कुडित्रे)

Web Title: Manufacturers' proposal for 12 per cent pay hike