Kolhapur Crime: जयसिंगपुरात खुनाचे सत्र सुरूच; वाढदिवसाची पार्टी द्यायला गेलेल्याचा मित्रांकडून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:15 IST2025-10-27T13:15:25+5:302025-10-27T13:15:44+5:30
मित्रांनीच केला घात

Kolhapur Crime: जयसिंगपुरात खुनाचे सत्र सुरूच; वाढदिवसाची पार्टी द्यायला गेलेल्याचा मित्रांकडून खून
जयसिंगपूर : मुलाच्या वाढदिवसाची पार्टी द्यायला गेलेल्या व्यक्तीचा पार्टीला आलेल्या मित्रांनी दगड डोक्यात घालून खून केला. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथे कृष्णा नदीच्या पात्रालगत असलेल्या जॅकवेलजवळ रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. लखन सुरेश घावट ऊर्फ बागडी (वय ३५, रा. मच्छी मार्केट परिसर, जयसिंगपूर) असे मृताचे नाव आहे.
खूनप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक केली आहे. अक्षय माने, संकेत हंबर, अमिन राजपूत, अमित सांगावकर, प्रथमेश ऊर्फ गोट्या पवार, अरविंद माळी (सर्व रा. जयसिंगपूर) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी योगेश सुरेश घावट यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, लखन घावट यांच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी घावट हे सहा मित्रांसोबत उदगाव (ता. शिरोळ) येथील पाणीपुरवठा जॅकवेलजवळ गेले होते. पार्टीदरम्यान किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादावादीत एका मित्राने लखनच्या डोक्यावर दगडाने वर्मी घाव केला. घटनेनंतर सर्वच मित्र पसार झाले. डोकीत वर्मी घाव झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात लखन पडले होते. जखमी अवस्थेत त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पोलिस पथकाने पाहणी केली.
घटनेनंतर आरोपी फरारी
खुनाच्या घटनेनंतर मित्र असलेले सहाजण फरारी झाले होते. गुन्हेशोध पथकाने शोधमोहीम राबवून रात्री उशिरा चौघांना ताब्यात घेतले; तर आणखी दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
खुनाचे सत्र सुरूच
लक्ष्मीपूजनादिवशी पूर्ववैमनस्यातून जयसिंगपूर येथे तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच जयसिंगपुरातील एकाचा उदगाव येथे खून झाल्याच्या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे. गेल्या नऊ महिन्यांत शिरोळ तालुक्यात खुनाच्या नऊ घटना घडल्या आहेत.
मित्रांनीच केला घात
लखन यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्या आनंदामध्ये त्यांनी मित्रांना पार्टी दिली होती. दिवाळीसाठी नवीन शिवलेले कपडेदेखील लखन याने घातले होते. जवळच्या मित्रांनीच घात केल्याची चर्चा घटनास्थळी होती.