Kolhapur Crime: दारूच्या वादातून झाला घात; कोयता हल्ल्यातील जखमीचा मृत्यू, खुनाचा गुन्हा नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:40 IST2025-10-20T15:38:54+5:302025-10-20T15:40:08+5:30
आरोपी घडसे व मयत देसाई दोघे मित्र होते

Kolhapur Crime: दारूच्या वादातून झाला घात; कोयता हल्ल्यातील जखमीचा मृत्यू, खुनाचा गुन्हा नोंद
कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे दारूच्या वादातून कोयत्याने झालेल्या हल्ल्यातील जखमी झालेला बाळासो शामराव देसाई (वय ३७, रा. दत्तवाड) याचा शनिवारी (दि. १८) रात्री सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे आरोपी वाल्मीकी घडसे (रा. दत्तवाड) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (दि. १०) ही घटना घडली होती.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी घडसे व मयत देसाई दोघे मित्र होते. काही दिवसांपूर्वी दारू पिण्यावरून दोघांमध्ये वाद होऊन घडसे याने देसाईंच्या कानशीलात मारली होती. त्यामुळे शुक्रवारी (दि. १०) याचा जाब विचारण्यासाठी देसाई याने आपला मित्र सुनील मगदूम याला घेऊन घडसे याच्या घरी गेला होता. त्याठिकाणी पुन्हा वादावादी झाल्याने घडसे याने देसाईसह मगदूम याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते.
त्याच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शनिवार (दि. १८) रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिस कॉन्स्टेबल विवेक कराडे यांनी आरोपी घडसे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली.