Kolhapur Crime: कुरिअरवाला म्हणून घरात घुसला, चाकूने वार करून वृद्धेला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:30 IST2025-11-08T18:29:46+5:302025-11-08T18:30:00+5:30
गिजवणे येथील घटना : गडहिंग्लजसह सीमाभागात खळबळ

Kolhapur Crime: कुरिअरवाला म्हणून घरात घुसला, चाकूने वार करून वृद्धेला लुटले
गडहिंग्लज : कुरिअरवाला म्हणून घरात घुसला आणि चाकूचा धाक दाखवून तिजोरीतील सुमारे १५ हजार रुपये लांबवले तसेच आणखी पैसे व दागिने न दिल्याने त्यांच्यावर चाकूने वार करून गंभीर केले. आक्कमहादेवी बाबासाहेब पाटील (वय ७७) असे जखमी वृद्धेचे नाव आहे.शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे गडहिंग्लजसह सीमाभागात खळबळ उडाली आहे.
पोलिस व घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी, गिजवणे येथे शुक्रवारी संध्याकाळी जैन समाजाच्या रथोत्सवाचा कार्यक्रम होता. त्यामुळे गावातील नागरिक तिकडे गेले होते. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील यांच्या पत्नी आक्कमहादेवी या घरी एकट्याच होत्या.
दरम्यान, चेहऱ्यावर मास्क लावलेल्या तरुणाने त्यांच्या घराची बेल वाजवली. कुरिअर बॉय म्हणून सांगितल्याने आक्कमहादेवींनी दरवाजा उघडला. घरात प्रवेश करताच त्यांने आतून कडी लावून दरवाजा बंद करून घेतला. त्यांचे तोंड दाबून धरले व चाकूचा धाक दाखवून तिजोरीतील रक्कम काढून घेतली.
त्यानंतर आणखी रक्कम व दागिने कुठे ठेवले आहेत अशी विचारणा केली.घरात होते तेवढे पैसे दिले आहेत,मारू नका, अशी विनवणी केली तरीदेखील त्याने चाकूने त्यांच्या डोक्यात व हातावर वार केले. त्यानंतर दरवाजा उघडून तो पळून गेला.
आक्कमहादेवींनी घराबाहेर येऊन आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना दुचाकीवरून येथील देसाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांनीच पोलिसांत फिर्याद दिली आहे. दरम्यान,पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
घटनास्थळी व देसाई हॉस्पिटलच्या परिसरात राजकीय पक्षांसह विविध स्तरांतील लोकांनी मोठी गर्दी केली होती. ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळावरील ठसे घेतले असून गुन्हयाच्या तपासासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
रेकी करूनच चोरी!
बी.एन.पाटील हे दररोज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास येथील आपल्या पेट्रोल पंपावर येतात.त्यानंतर आक्कमहादेवी या घरी एकट्याच असतात.रथोत्सवामुळे गल्लीतही कुणी नव्हते.त्यामुळे चोरट्यांने रेकी करुनच हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बांगड्याही काढून घेण्याचा प्रयत्न
आक्कमहादेवी यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेण्याचाही चोरांने प्रयत्न केला.परंतु,त्या हातातून निघाल्या नाहीत.त्यावेळी प्रतिकार केल्यानेच त्यांने त्यांच्यावर चाकूने वार केला.त्यामुळे घरात सगळीकडे रक्त सांडले होते.