टाकाळा परिसरात रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 17:36 IST2020-07-21T17:18:45+5:302020-07-21T17:36:30+5:30
राजारामपुरी टाकाळा परिसरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णावर उपचार करू नयेत, यासाठी रुग्णालयातील रिसेप्शन कौंटरवर विटा फेकून तोडफोड केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी संशयितास अटक केली. प्रथमेश नामदेव मस्कर (रा. सिद्धिविनायक हॉस्पिटलमागे, टाकाळा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

टाकाळा परिसरात रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्यास अटक
कोल्हापूर : राजारामपुरी टाकाळा परिसरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णावर उपचार करू नयेत, यासाठी रुग्णालयातील रिसेप्शन कौंटरवर विटा फेकून तोडफोड केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी संशयितास अटक केली. प्रथमेश नामदेव मस्कर (रा. सिद्धिविनायक हॉस्पिटलमागे, टाकाळा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील साथीच्या रोगाने ग्रस्त रुग्णांवर टाकाळा परिसरातील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचार केले जात आहेत. या हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ रुग्णांवर उपचार करू नयेत, अशी स्थानिकांची मागणी होती. तरीसुद्धा उपचार सुरूच ठेवल्याने शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने रुग्णालयाच्या रिसेप्शन कौंटरवर विटा फेकून त्याचे नुकसान केले.
या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. यातील संशयितांचा शोध तत्काळ घेण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी पोलीस कर्मचार्यांना दिले होते.
त्याअनुषंगाने राजारामपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित गुरव यांनी संशयित मस्कर यास शोधून अटक केली. कोविड-१९ साथीच्या रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये व डॉक्टरांवर कोणी हल्ला किंवा धमकाविल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी दिला आहे.