Kolhapur News: हातकणंगलेत इंडस्ट्रीजला भीषण आग, चार कामगार गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:25 IST2026-03-13T12:24:34+5:302026-03-13T12:25:02+5:30
कंपनीचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

Kolhapur News: हातकणंगलेत इंडस्ट्रीजला भीषण आग, चार कामगार गंभीर जखमी
हातकणंगले : येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतमधील कालिया ग्रुपच्या आयुष इंडस्ट्रीजमध्ये गुरुवारी दुपारी १ वाजता वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरला शॉटसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे चार कर्मचारी गंभीर जखमी झाले. यात कंपनीचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
जखमी कामगारांवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची तक्रार कंपनीचे चालक आयुष दिनेशकुमार कालिया यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हातकणंगलेच्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतमधील कालिया ग्रुपच्या आयुष इंडस्ट्रीजला भरदुपारी रणरणत्या उन्हात कंपनीच्या आवारातील ट्रान्सफॉर्मरला आग लागली. ती कंपनीच्या इलेक्ट्रिक विभागापर्यंत पोहोचली. कंपनीतील ऑइल आणि कच्च्या मालाला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले.
आग विझवताना कंपनीचे दीपक कांबळे ( वय ४० रा.रुई) राहुल पाटील (३४ रा. कोल्हापूर), रामनिवास बन्ना, (३५), अविनाश शेरेकर (३२ दोघे रा.माणगाव) या कामगारांना आगीच्या झळा लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम आयजीएम रुग्णालय इचलकरंजी येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.