Kolhapur Municipal Corporation Election: महाविकास आघाडीत एकमत, महायुतीत सस्पेन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:45 IST2025-12-05T12:42:55+5:302025-12-05T12:45:02+5:30
युतीकडे इच्छुकांची भाऊगर्दी

Kolhapur Municipal Corporation Election: महाविकास आघाडीत एकमत, महायुतीत सस्पेन्स
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एकत्र लढण्यावर महाविकास आघाडीत एकमत झाले असले तरी महायुतीत मात्र असूनही सस्पेन्स कायम आहे. नगरपालिका निवडणुकीतील विचित्र आघाड्यांनी पक्ष नेते दुखावल्याने तसेच एकमेकांना शह देण्याचे कारस्थाने घडल्याने महायुतीत अस्वस्थता आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना त्यांच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने स्वतंत्र लढून नंतर एकत्र येऊ, असा विचार पुढे येऊ लागला आहे.
काँग्रेस, भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, आम आदमी पक्ष, मनसे असे सात प्रमुख पक्ष महापालिकेची निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. परंतु महापालिकेच्या सर्वच्या सर्व ८१ जागा लढविण्याची ताकद कोणत्याही एका पक्षात नाही. त्यामुळे कोणाशी तरी आघाडी, युती करावी लागणार आहे. परंतु ही प्रक्रिया महाविकास आघाडीत शक्य आहे. महायुतीत शक्य होईल असे दिसत नाही. कारण देशात, राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षांकडे स्थानिक पातळीवरील निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त असते. तशी ती या निवडणुकीतही असल्याचे पहायला मिळत आहे.
महापालिकेची निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपली आहे, आठ-दहा दिवसात निवडणूक जाहीर होईल, अशी परिस्थिती आहे. तरीसुद्धा सत्तेतील या तिन्ही पक्षात अद्यापही सुसंवाद, समन्वय साधला गेलेला नाही. प्रत्येक पक्षाने आपल्या आपल्या प्रमुखांवर जबाबदाऱ्या टाकल्या आहेत, परंतु युती करण्याच्या दृष्टीने समन्वयक नेमलेले नाहीत. किंवा जबाबदाऱ्याही निश्चित केलेल्या नाहीत. त्यामुळे चर्चेची, संवादाची सुरुवात झालेली पहायला मिळत नाही.
महाविकास आघाडीची एकहाती सगळी जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्यावर आहे. उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते सतेज पाटील ठरवतील तीच भूमिका असेल असे सांगत आहेत. कारण त्यांची २० ते २२ जागांपेक्षा जास्त जागांची अपेक्षा नाही. काँग्रेसकडे मात्र ४० हून अधिक उमेदवारांची यादी तयार आहे. यातील बहुतांशी उमेदवार मागच्या काही निवडणुकीत निवडून आलेले आहेत. काही उमेदवार दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले आहेत. किती जागा पाहिजेत यावर वाद न घालता ज्या मिळतील त्या ताकदीने लढविण्याची मानसिकता तिन्ही पक्षांची आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील उद्या कोल्हापुरात
भाजपची प्रमुख जबाबदारी असलेले मंत्री चंद्रकांत पाटील उद्या, शनिवारी कोल्हापूर येत असून निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव यांच्याशी चर्चा करणार आहेत. महायुती म्हणून लढायचे की स्वतंत्र हे मंत्री पाटील हेच सांगतील, असे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
महायुतीत रस्सीखेच जोरात
महायुतीत सहभागी असलेल्या तिन्ही पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. भाजपपेक्षा शिंदे सेनेने जास्त आक्रमकपणे तयारी सुरू केली आहे. मागच्या सभागृहात भाजपपेक्षा राष्ट्रवादीने जास्त जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे अपेक्षा जास्त आणि जागा कमी यातून महायुतीचे गणित जुळवताना कठीण जाणार आहे. जागा वाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो.