Kolhapur: संन्यासाशिवाय जीव तीर्थंकर होत नाही - विशुद्ध सागर महाराज; नांदणी येथे महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:07 IST2025-01-02T13:05:22+5:302025-01-02T13:07:09+5:30
उदगाव : खोटी प्रतिष्ठा, अहंकार यामुळे मानवाने मानवतेचा नाश केला आहे. बनावटगिरी जास्त काळ चालत नाही. परिवर्तन करणे सरळ ...

Kolhapur: संन्यासाशिवाय जीव तीर्थंकर होत नाही - विशुद्ध सागर महाराज; नांदणी येथे महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ
उदगाव : खोटी प्रतिष्ठा, अहंकार यामुळे मानवाने मानवतेचा नाश केला आहे. बनावटगिरी जास्त काळ चालत नाही. परिवर्तन करणे सरळ आहे, मात्र त्याग करणे कठीण आहे. संन्यासाशिवाय जीव तीर्थंकर होऊ शकत नाही. परिग्रह सोडणे हा आत्म्याचा सन्मान आहे, असे प्रतिपादन आचार्य विशुद्धसागर महाराज यांनी केले.
नांदणी (ता. शिरोळ) येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठा महोत्सव व महास्तकाभिषेक सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी आचार्य विशुद्धसागर महाराज बोलत होते. यावेळी आचार्य धर्मसेन महाराज, आचार्य विद्यानंद महाराज, सौम्यसागर महाराज, आदींचे प्रवचन झाले. आचार्य धर्मसेन महाराजांनी परिग्रह परिवार, परिणाम, कर्म याबाबत आशीर्वाचन दिले. आचार्य विद्यानंद महाराजांनी भगवंतांच्या पंचकल्यानिकाची माहिती दिली. हा सोहळा स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी यांच्या आज्ञेवरून होत आहे.
नांदणी येथे बुधवार (दि. १) पासून नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यास अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला. ५१ मुनी,१६ माताजी, त्यागी व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व मंडप उद्घाटनाने झाली. बुधवारी दिवसभर इंद्रप्रतिष्ठा, व्रतबंधन, मंगल प्रवचन, मंगल कलश स्थापना, नवग्रह होम, मंडप वेदी प्रतिष्ठा, शांतीविधान हे कार्यक्रम पार पडले. तसेच गर्भकल्याण पूर्व, सौधर्म इंद्र व इंद्रग्रणांचे आगमन इंद्रसभा, नगररचना, संगीत आरती, भव्य मिरवणूक आदी कार्यक्रम पार पडले.
यावेळी उपस्थित आचार्यांना शास्त्रभेट देण्यात आले. कार्यक्रमास आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी खासदार राजू शेट्टी, आदींनी हजेरी लावली. यावेळी प्रफुल मेहता, किशोर पहाडिया, प्रकाश झांझरिया यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी रेंदाळ व समडोळी येथून चालत आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले.