Kolhapur: वारणेच्या कुस्ती मैदानात सिकंदर शेखने इजिप्तच्या मल्लाला दाखवले अस्मान, अवघ्या ६ व्या मिनिटाला घिस्सा डावावर केले चितपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:41 IST2024-12-14T13:40:43+5:302024-12-14T13:41:44+5:30
आनंदा वायदंडे / रवींद्र पोवार वारणानगर : कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या आणि अत्यंत अटीतटीने खेळलेल्या लढतीत महाराष्ट्र केसरी ...

Kolhapur: वारणेच्या कुस्ती मैदानात सिकंदर शेखने इजिप्तच्या मल्लाला दाखवले अस्मान, अवघ्या ६ व्या मिनिटाला घिस्सा डावावर केले चितपट
आनंदा वायदंडे / रवींद्र पोवार
वारणानगर : कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या आणि अत्यंत अटीतटीने खेळलेल्या लढतीत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने इजिप्तच्या अहमद तौफिकला अवघ्या सहाव्या मिनिटांत घिस्सा डावावर चितपट करीत सिकंदर शेखने ‘जनसुराज्य शक्ती’ किताब पटकावला.
कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने नाकपटी घिस्सा डावावर इजिप्तच्या सल्लाउद्दीन अब्बासला पराभूत करत ‘वारणा साखर शक्ती’ किताब मिळविला. पंजाबच्या भूपेंद्र अजनाळाने पुण्याच्या शैलेश शेळकेदर घुटना डावावर विजय मिळवून ‘वारणा दूध संघ शक्ती’ किताब पटकाविला.
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या ३० व्या पुण्यस्मरणानिमित्त वारणा विद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी भारत विरुद्ध इजिप्त आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम मैदान पार पडले. दुपारी विश्वेश कोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुस्ती मैदानास प्रारंभ झाला. मैदान पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकसह अन्य राज्यांतून हजारोंच्या संख्येने कुस्ती शौकीन आले होते. मैदानात प्रमुख अकरा शक्तीश्री किताबासह लहान-मोठ्या २५० लढती पार पडल्या. इजिप्तच्या मल्लांसह भारतातील नामवंत मल्लांनी मैदानात प्रेक्षणीय लढती करून मैदान गाजवले.
प्रथम क्रमांकाच्या ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताबासाठी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध इजिप्तच्या अहमद तौफिकशी लढत झाली. सिकंदर शेखने पहिली पकड घेत तौफिकवर ताबा घेतला. दोन्ही मल्लांनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी पैलवानावर ताबा घेण्याचा सतत प्रयत्न करत होते.
दोन्ही पैलवान तेवढ्याच ताकदीचे असल्याने एकमेकावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला; परंतु सिकंदर शेखने घिस्सा डाव मारणेचा प्रयत्न केला. त्यात ६ व्या मिनिटाला सिकंदर शेखने तौफिकला घिस्सा डावावर चितपट केले.यावेळी सिकंदरला कुस्ती शौकिनांनी अगदी डोक्यावर घेत त्याच्या खेळाला दाद दिली. त्याला आमदार डॉ. विनय कोरे, आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते किताब देऊन सन्मानित केले.
‘वारणा साखर शक्ती’ किताबासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) विरुद्ध जागतिक विजेता सल्लाउद्दीन अब्बास (इजिप्त) यांच्यात लढत झाली. यावेळी पृथ्वीराजने अब्बासला नाकपटी डावावर अब्बासला चितपट केले. ही कुस्ती तब्बल १६ मिनिटे चालली. त्यावेळी दोन्ही पैलवानांनी डाव प्रतिडाव करत कुस्ती मारण्याचा प्रयत्न केला. सल्लाउद्दीन हा तसा सव्वासहा फुटांचा उंचीचा पैलवान होता. पृथ्वीराज तसा कमी उंचीचा असूनदेखील त्याने प्रतिस्पर्धी पैलवान अब्बासला चांगलीच टक्कर दिली. पृथ्वीराजने अनेकवेळा अब्बासवर ताबा घेत त्याला खाली खेचले त्यावेळी पृथ्वीराज नाकपटी घिस्सा डावावर अब्बासला चितपट केले व ‘वारणा साखर शक्ती’ किताब मिळविला.
‘वारणा दूध संघ शक्ती’ किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके विरुद्ध भूपेंद्र अजनाळा (पंजाब) यांच्यात अंत्यत अटीतटीची लढत होऊन अवघ्या ६ मिनिटांत एकेरी पट काढून घुटना डावावर भूपेंद्र अजनाळने शैलेश शेळकेला चितपट करत ‘वारणा दूध संघ’ किताब पटकाविला.
‘वारणा बँक शक्ती’ किताबासाठी झालेल्या उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर (गंगावेश) विरुद्ध आंतरराष्ट्रीय विजेता दिनेश गुलिया (दिल्ली) यांच्यातील लढत प्रेक्षणीय ठरली एकेरी पट काढून दिनेश गुलियाने प्रकाश बनकरला चितपट केले. तब्बल २८ मिनिटे ही कुस्ती रंगली या कुस्तीत २५ मिनिटांत निकाली न झाल्याने अखेर कुस्ती गुणावर घेण्यात आली त्यात दिनेश गुलिया विजेता ठरला.
‘वारणा दूध साखर वाहतूक शक्ती’ किताबासाठी राष्ट्रीय विजेता दादा शेळके (पुणे) विरुद्ध राष्ट्रीय विजेता मनजीत खत्री (हरियाणा) यांच्यात अटीतटीत झालेल्या लढतीत दादा शेळकेने पाय लावून घिस्सा डावावर मनजीत खत्रीला चितपट करून ‘वारणा दूध साखर वाहतूक शक्ती’ किताब पटकावला.