स्वस्त दागिन्यांचे आमिष; ३० लाखांचा गंडा, कोल्हापुरातील महिलेस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:22 IST2025-08-07T12:22:01+5:302025-08-07T12:22:25+5:30
मायलेकाने केली फसवणूक,

स्वस्त दागिन्यांचे आमिष; ३० लाखांचा गंडा, कोल्हापुरातील महिलेस अटक
कोल्हापूर : तीन किलो सोने खरेदी करण्यासाठी थोडे पैसे कमी पडत आहेत. दोन महिन्यांसाठी पैशांची मदत करा. त्याबदल्यात चांगला परतावा आणि कमी किमतीत सोने देतो, असे सांगून मायलेकाने शिवाजी पेठेतील महिलेस ३० लाखांचा गंडा घातला. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या काळात घडला.
याबाबत अनिता नंदकुमार सूर्यवंशी (वय ५८, रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) या महिलेने बुधवारी (दि. ६) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जयश्री मोहन माजगावकर (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) हिच्यावर गुन्हा दाखल केला. तिला बुधवारी (दि. ६) अटक केले. जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अनिता सूर्यवंशी आणि अटकेतील महिला जयश्री माजगावकर यांची तोंडओळख होती. त्याच ओळखीतून माजगावकर हिने सूर्यवंशी यांच्याकडे सोने खरेदीसाठी पैशांची मागणी केली.
तिने मुलाच्या मदतीने २० लाख ४५ हजारांची रोकड आणि ९ लाख १५ हजार रुपये किमतीचे ३० तोळे दागिने घेतले. दोन महिन्यांनंतर सूर्यवंशी यांनी पैसे परत मागितले. मात्र, माजगावकर हिने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. वारंवार मागूनही पैसे आणि दागिने परत मिळत नसल्याने अखेर सूर्यवंशी यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने माजगावकर हिला अटक केली.
चांगल्या परताव्याचे आमिष
सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार करीत असल्याचे सांगून चांगला परतावा आणि कमी किमतीत दागिने देण्याचे आमिष माजगावकर हिने दाखवले होते. याच आमिषाला भुलून सूर्यवंशी यांनी रोकड आणि स्वत:कडील दागिनेही दिले. मात्र, पैसे आणि दागिनेही अडकून पडल्याने त्यांची फसवणूक झाली.