कोल्हापुरातील कळंबा कारागृहात स्वच्छतागृहात सापडले पिस्तुलाचे जिवंत काडतूस, पिस्तुलाचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:42 IST2025-11-04T11:41:12+5:302025-11-04T11:42:28+5:30
मोक्कातील पुण्यातील दोन कैद्यांवर गुन्हा दाखल, घटनेने खळबळ

संग्रहित छाया
कोल्हापूर : कळंबा कारागृहातील सर्कल क्रमांक सातच्या पूर्वेकडील चार नंबरच्या स्वच्छतागृहात झडतीदरम्यान पिस्तुलाचे जिवंत काडतूस सापडले. याबाबत मोक्कातील कैदी सुरेश बळीराम दयाळू आणि अमीर ऊर्फ चंक्या असिर खान या दोघांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काडतूस सापडल्याने कैद्यांकडे पिस्तूल असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलिसांकडून कारागृह आणि कैद्यांची झडती सुरू आहे. शनिवारी (दि. १) काडतूस सापडल्यानंतर दोन दिवसांनी सोमवारी (दि. ३) गुन्हा दाखल झाला. या घटनेने कारागृहात खळबळ उडाली आहे.
जुना राजवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहातील सुभेदार उमेश शामू चव्हाण (वय ५२, रा. कळंबा, कोल्हापूर) हे सहकाऱ्यांसह शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कारागृहातील सर्कल क्रमांक सातची झडती घेत होते. त्यावेळी चार नंबरच्या स्वच्छतागृहात एका प्लास्टिकच्या पिशवीत लपवलेले जिवंत काडतूस त्यांना मिळाले. त्यांनी याची माहिती वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत संबंधित काडतूस मोक्कातील कैदी सुरेश दयाळू आणि अमीर ऊर्फ चंक्या खान यांनी लपवल्याची माहिती मिळाली. हे दोन्ही कैदी पुणे जिल्ह्यातील आहेत.
याबाबत सुभेदार चव्हाण यांनी सोमवारी (दि. ३) सकाळी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी चार तास कारागृहाची झडती घेऊन काही कैद्यांची चौकशी केली. मात्र, कारागृहात काडतूस कसे आले? ते कोणी आणले? कधी आणले? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. दोन दिवसात या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती निरीक्षक झाडे यांनी दिली.
कोणाचा गेम करण्यासाठी काडतूस?
कळंबा कारागृहात सध्या पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील काही गुंड शिक्षा भोगत आहेत. यातील काही टोळ्यांमध्ये संघर्ष वाढला आहे. कारागृहात याचे अधूनमधून पडसाद उमटत आहेत. काडतूस सापडले याचा अर्थ पिस्तूलही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणाचा गेम करण्याचा कट कारागृहात शिजत आहे, याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसह कारागृह प्रशासनासमोर आहे.
दोन दिवसांनी गुन्हा दाखल
कारागृहात शनिवारी दुपारी काडतूस सापडले. या गंभीर घटनेची फिर्याद सोमवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली. फिर्याद देण्यासाठी कारागृह प्रशासनाने दोन दिवसांचा विलंब का लावला? स्वच्छतागृहात सापडलेले काडतूस दयाळू आणि खान याच दोन कैद्यांनी ठेवल्याचे कशावरून स्पष्ट झाले? काडतूस असेल तर पिस्तूल का सापडले नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. तपासणीदरम्यान कारागृहात काही मोबाइल सापडल्याचीही चर्चा सुरू आहे.