कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होताच गोवा बनावटीच्या दारू तस्करीचा जोर वाढला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय पथकाने गुरुवारी (दि. १३) पहाटे तीन ठिकाणी कारवाई करून साडेसहा लाखांची दारू आणि १२ लाखांची तीन वाहने असा १८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दारूची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती निरीक्षक किरण पवार यांनी दिली.गारगोटी येथे लावलेल्या सापळ्यात प्रवीण सतीश गायकवाड (वय ३३, रा. मुरगुड, ता. कागल) याला अटक केली. त्याच्याकडील गोवा बनावटीचा दारूचा साठा आणि कार जप्त केली. बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे केलेल्या कारवाईत योगेश जनार्दन मस्कर (२१, रा. आत्याळ, ता. गडहिंग्लज) याला अटक केली. त्याच्याकडील पिकअप वाहन आणि दारूचा साठा भरारी पथकाने जप्त केला. आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे केलेल्या कारवाईत अनंत अरुण मेस्त्री (३३, रा. सावंतवाडी) याला अटक केली. तिन्ही वाहनांमधील साडेसहा लाखांचा दारूसाठा पथकांनी जप्त केला. निरीक्षक पवार यांच्यासह दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, मारुती पोवार, राजेंद्र कोळी, विशाल आळतेकर, आदींच्या पथकांनी कारवाया केल्या.नाकाबंदीसह भरारी पथकांची नजरआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि कर्नाटकातून जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकाबंदी केली असून, संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय भरारी पथकांची दारू तस्करीवर करडी नजर आहे. त्यामुळे कोणीही दारूची अवैध वाहतूक आणि विक्री करून कारवाई ओढवून घेऊ नये, असे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.
Kolhapur: निवडणुकीपूर्वी दारू तस्करी वाढली, नाकाबंदीसह भरारी पथकांची नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:20 IST