अलिशान कारमधून दारुची तस्करी, कोल्हापुरात ९ लाखांच्या मुद्देमालासह तरुणास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:04 IST2025-11-01T12:02:41+5:302025-11-01T12:04:37+5:30
सापळा रचला, कारचा पाठलाग करून केली कारवाई

अलिशान कारमधून दारुची तस्करी, कोल्हापुरात ९ लाखांच्या मुद्देमालासह तरुणास अटक
कोल्हापूर : बेकायदेशीररीत्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणारी अलिशान कार राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी दुपारी पकडली. या कारमधून सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांच्या मद्याच्या बाटल्या आणि अलिशान कार, असा एकूण ८ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई शुक्रवारी दुपारी सायबर चौक ते राजाराम कॉलेज रोडवर करण्यात आली. याप्रकरणी चालक प्रथमेश यशवंत पाटील (वय २३, रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजारामपुरी परिसरातून एका अलिशान कारमधून देशी-विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिस हवालदार संदीप सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सायबर चौक ते राजाराम कॉलेज मार्गावर सापळा रचला होता.
दुपारी साडेतीनच्या सुमारास एक संशयित कार सायबर चौकातून भरधाव वेगाने जात असल्याचे दिसल्याने पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या कारचा पाठलाग करून राजाराम कॉलेजच्या गेटसमोर ती कार थांबवत तपासणी केली असता, २ लाख ८५ हजार रुपयांच्या वेगवेगळ्या कंपनींच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या.
कार चालक प्रथमेश पाटील याला ताब्यात घेऊन, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अंमलदार अमोल पाटील, कृष्णात पाटील, सचिन पाटील, संदीप सावंत, सत्यजीत सावंत, विशाल शिरगावकर आणि सुशांत तळप यांनी केली.