कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून जन्मठेपेतील कैद्याचे पलायन, शोधमोहीम सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:24 IST2025-07-25T13:23:38+5:302025-07-25T13:24:24+5:30
प्रेयसीच्या मदतीने तिच्या नवऱ्याचा केला होता खून

कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून जन्मठेपेतील कैद्याचे पलायन, शोधमोहीम सुरु
कोल्हापूर : प्रेयसीच्या मदतीने तिच्या नवऱ्याचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी सुरेश अप्पासो चोथे (वय ३८, मूळ रा. चोथेवाडी, ता. गडहिंग्लज) हा कळंबा कारागृहाबाहेरील कार वॉशिंग सेंटरवरून ग्राहकाची कार घेऊन पळून गेला. हा प्रकार गुरुवारी (दि. २४) दुपारी तीनच्या सुमारास घडला. पोलिसांकडून शहरासह जिल्ह्यात नाकाबंदी करून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नाही.
जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, कैदी क्रमांक ३८६ सुरेश चोथे हा ऑगस्ट २०२२ पासून कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तो सध्या खुल्या कारागृहात होता. त्यामुळे त्याला कारागृहाबाहेरील कार वॉशिंग सेंटरवर कामाची जबाबदारी दिली होती. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तो एका कारची स्वच्छता करीत होता.
स्वच्छ केलेली कार बाजूला लावण्याच्या निमित्ताने तीच कार (एम एच ०९ जी ए २१६१) घेऊन तो निघून गेला. हा प्रकार लक्षात येताच कारागृह पोलिसांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर रात्री उशिरा याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शहरासह जिल्ह्यात नाकाबंदी करून कैद्याचा शोध सुरू केला.
तक्रार देण्यास उशीर
कैदी पळाल्याची घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देणे गरजेचे होते. मात्र, रात्री दहाच्या सुमारास कारागृह पोलिसांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली. कारागृह प्रशासनाने कैदी पळाल्याची माहिती वेळेत दिली असती तर, त्याचा तातडीने शोध घेता आला असता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
भडगाव येथील खून प्रकरणात शिक्षा
सुरेश चोथे याने नोव्हेंबर २०१७ मध्ये भडगाव येथे प्रेयसीच्या मदतीने तिच्या शिक्षक पतीचा खून केला होता. त्यानंतर दोघांनी मिळून शिक्षकाचा मृतदेह अंबोली येथील कावळेसाद दरीत फेकला होता. त्या गुन्ह्यात सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने चोथे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ऑगस्ट २०२२ पासून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता.