कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला, शोधमोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:56 IST2024-12-21T11:56:40+5:302024-12-21T11:56:58+5:30

एकच कर्मचारी बंदोबस्तावर

Life imprisonment prisoner escapes from Kalamba jail in Kolhapur | कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला, शोधमोहीम सुरू

कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला, शोधमोहीम सुरू

कोल्हापूर : खुल्या कारागृहात स्वच्छतागृहाला जाऊन दहा मिनिटांत येतो, असे सांगून कळंबा मध्यवर्ती कारागृहातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी वजीर नानसिंग बारेला (वय ५०, रा. किराडी, ता. तेंदवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) हा पळाला. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खुल्या कारागृहातून शेताच्या बांधावरून उडी टाकून तो पसार झाला.

वजीर बारेला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेला कैदी आहे. त्याला नाशिक कारागृहातून १८ जुलै २०२४ रोजी कळंबा कारागृहात दाखल केले. त्याचे यापूर्वीचे वर्तन चांगले असल्याने खुल्या कारागृहात ठेवण्यात आले. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कारागृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शेतीत काम करण्यासाठी ३० हून अधिक कैद्यांना सोडण्यात आले.

त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या कारागृह कर्मचाऱ्याला स्वच्छतागृहात जाऊन दहा मिनिटांत येतो, असे सांगून तो पसार झाला. शेताच्या बांधावर त्याने कारागृहाचा गणवेश काढला आणि तेथून तो पसार झाला. हा प्रकार अन्य कैद्यांच्या लक्षात आला. त्यांनी ही माहिती कारागृह पोलिसांनी सांगितल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली.

एकच कर्मचारी बंदोबस्तावर

चांगले वर्तन असलेल्या कैद्यांना खुल्या कारागृहातील काम दिले जाते. सुमारे ३० हून अधिक कैद्यांना एकावेळी कामासाठी नेले जाते. शेती कामासाठी मंगळवार पेठ आणि कारागृहाच्या पाठीमागील शेतात नेले होते. या कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी केवळ एकच कारागृह कर्मचारी तैनात केला जातो.

गेल्या सहा महिन्यांपासून तो खुल्या कारागृहात होता. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्याचा संयुक्तपणे तपास सुरू आहे. -नागनाथ सावंत, वरिष्ठ कारागृह अधीक्षक

Web Title: Life imprisonment prisoner escapes from Kalamba jail in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.