Kolhapur Crime: अपहरण करून चिमुरड्या वरदचा खून, आरोपीस आजन्म कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:31 IST2025-02-25T17:30:14+5:302025-02-25T17:31:44+5:30
अनिल पाटील मुरगूड : सोनाळी ता.कागल येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या बालकाचा अपहरण करुन खून केल्या प्रकरणी ...

Kolhapur Crime: अपहरण करून चिमुरड्या वरदचा खून, आरोपीस आजन्म कारावास
अनिल पाटील
मुरगूड : सोनाळी ता.कागल येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या बालकाचा अपहरण करुन खून केल्या प्रकरणी अटकेत असणारा संशयित आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय ४५ रा सोनाळी ता.कागल) याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. आज, मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांनी ही शिक्षा ठोठावली.
१७ ऑगस्ट २०२१ रोजी वरद खून प्रकरण चांगलेच गाजले होते. आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी वरदच्या कुटुंबियांनी आणि सोनाळी व सावर्डे ग्रामस्थांनी विविध मोर्चे आंदोलने केली होती. मुरगूड पोलिसांनी हे प्रकरण संवेदनशील पणे हाताळून आरोपीला तात्काळ अटक केली होती. वरदच्या कुटुंबीयांनी मात्र आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी उचलून धरली होती.
अधिक माहिती अशी, सोनाळी येथील वरद पाटील हा आजोबा दत्तात्रय शंकर म्हातूगडे यांच्या घरी वास्तूशांती समारंभासाठी गेला होता. दरम्यान १७ ऑगस्ट २०२१रोजी रात्री आठ पासून तो बेपत्ता होता. रात्रभर घरच्यांनी त्याचा शोध घेतला पण त्याचा शोध न लागल्याने अखेर मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दिली. मुरगूड पोलिसांनी दोन दिवसांमध्ये तपासाची चक्रे वेगाने फिरवून काही तासात संशयित म्हणून दत्तात्रय उर्फ मारुती वैद्य याला ताब्यात घेतले होते.
वैद्य हा वास्तूशांती समारंभासाठी सावर्डे या गावी गेला होता.त्याला सावर्डे मधील काहींनी वरद बरोबर पाहिले होते. त्यामुळे मुरगूड पोलिसांचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आपण वरदचे अपहरण केले असून त्याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली होती. या गुन्ह्याचा तपास मुरगूडचे तत्कालीन सहा पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहा पोलीस उप निरीक्षक किशोरकुमार खाडे, सहा पोलीस उप निरीक्षक कुमार ढेरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. सरकारतर्फे या खटल्यात प्रधान जिल्हा सरकार वकील विवेक शुक्ल , विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी काम पाहिले होते.