Leopard in Kolhapur: पोलिस शिपाई कृष्णा पाटील यांनी धाडसाने परतवला हल्ला-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:08 IST2025-11-12T12:07:34+5:302025-11-12T12:08:06+5:30
बिबट्या परत मागे फिरला असता तर काही तरी अघटित घडले असते

Leopard in Kolhapur: पोलिस शिपाई कृष्णा पाटील यांनी धाडसाने परतवला हल्ला-video
कोल्हापूर : ताराबाई पार्कातील विवेकानंद कॉलेजसमोरील परिसराची करत असतानाच बिबट्याने अचानक पोलिस शिपाई कृष्णा पाटील यांच्यावर मंगळवारी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने धाडसाने तो हल्ला परतवून लावला. त्यांच्या या धाडसाचे मंगळवारी सर्वत्र कौतुक झाले. खरेतर पाटील हे मृत्यूच्या दाढेतूनच परत आले. कारण हल्ला केल्यानंतर ते खाली पडले होते, बिबट्या परत मागे फिरला असता तर काही तरी अघटित घडले असते. यामध्ये पाटील जखमी झाले.
पाटील यांनी काठीने मारल्यामुळे बिबट्या पळून जवळच्या महावितरणच्या ड्रेनेज चेंबरमध्ये लपला. महापालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत शासकीय विश्रामगृहात होते. येथे बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षक संतोष डोके आपल्या सहकाऱ्यासोबत जात होते. त्यावेळी त्यांना ताराबाई पार्कातील वुडलॅंन्डजवळ बिबट्या आल्याचे कळाले. त्याला पाहण्यासाठी गर्दी झाल्याचे सांगण्यात आल्यानंतर ते तातडीने पोलिस कृष्णात पाटील, एच. व्ही. लंबे, इंद्रजित भोसले यांच्यासह तेथे दाखल झाले.
वाचा : जखमी वडिलांना पाहताच मुलीने मिठी मारली अन् हंबरडा फोडला
त्यानंतर परिसरात रहिवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात राहिले. परिसराची पाहणी सुरू केली. त्यावेळी बिबट्याने अचानक पथकातील पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या छातीवर, हाताला जखम झाली. ते जमिनीवर मागे पडले. तरीही उठून त्यांनी कर्तव्य बजावले. निरीक्षक डोके, पोलिस पाटील यांनी बिबट्या आला असताना जीवावर उदार होऊन धाडसाने अत्यंत कमी वेळात उपस्थितांची गर्दी पांगवून शौर्य दाखविले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी न होता बिबट्याला जिवंत पकडण्यात यश आले. मानवी वस्तीमध्ये येण्यापासून बिबट्याला हटकल्याने पोलिसांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.