Crime News kolhapur: दिंडनेर्लीतून सहा लाख किंमतीचे बिबट्याचे कातडे जप्त, दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:48 IST2022-07-01T17:46:41+5:302022-07-01T17:48:07+5:30
बिबट्याचे कातडी विक्री करण्यासाठी निघाले असता केली कारवाई

Crime News kolhapur: दिंडनेर्लीतून सहा लाख किंमतीचे बिबट्याचे कातडे जप्त, दोघे ताब्यात
कोल्हापूर : येथील कोल्हापूर -गारगोटी रोडवरील दिंडनेर्ली (ता.करवीर) फाटा येथून सहा लाख रूपये किंमतीचे बिबट्याचे कातडे बेकायदेशीर बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघा जणांना ताब्यात घेतले. बाजीराव श्रीपती यादव (वय ३९, रा. सोनुर्ले,ता. भुदरगड) व ब्रम्हदेव शशिकांत पाटील (वय ३२, रा.किटवडे, ता. आजरा) या दोंघा संशयितांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांनी विविध पथके तयार केली आहेत. त्यानूसार शाखेकडील अंमलदार संभाजी भोसले यांना दोघेजण बिबट्याचे कातडी विक्री करण्यासाठी गारगोटीहून दिंडनेर्लीकडे येणार असल्याची माहिती गोपनिय बातमीदाराकडून मिळाली.
त्यानूसार पोलीस निरीक्षक गोर्ले यांनी अंमलदार संभाजी भोसले, राजीव शिंदे, खंडेराव कोळी, बालाजी पाटील या पथकाने कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर दिंडनेर्ली फाटा (ता. करवीर) येथे सापळा रचून संशयित बाजीराव यादव व ब्रम्हदेव पाटील या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा लाख रूपये किंमतीचे बिबट्याचे कातडे मिळून आले. मुद्देमालासह दोघा संशयितांना इस्पुर्ली पोलीस ठाण्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे.