Kolhapur: पन्हाळ्यावर बिबट्याचे दोन दिवसांपासून वास्तव्य, सीसीटीव्हीमध्ये कैद
By संदीप आडनाईक | Updated: January 15, 2026 13:08 IST2026-01-15T13:08:02+5:302026-01-15T13:08:42+5:30
कुत्र्याची शिकार न करताच परतला बिबट्या

Kolhapur: पन्हाळ्यावर बिबट्याचे दोन दिवसांपासून वास्तव्य, सीसीटीव्हीमध्ये कैद
कोल्हापूर : पन्हाळगडावरील सज्जाकोठी परिसरातील डॉ. राज होळकर यांच्या तबक बागेशेजारील मिशन बंगल्याच्या आवारात दोन दिवस बिबट्याचे वास्तव्य असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पन्हाळगडावरील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पन्हाळगडावर सध्या बिबट्याचे वास्तव्य असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून दिसत आहे. या बिबट्याचे परिसरातील ग्रामस्थाना अधून मधून दर्शन होत असते. १३ आणि १४ जानेवारीच्या पहाटे सज्जा कोठी परिसरातील मिशन बंगल्यातील डॉ. राज होळकर यांच्या राजाची झोपडी या बंगल्याच्या आवारात बिबट्या दिसून आला. डॉ. होळकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आज मंगळवार दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी 'आमचे जावई' पुन्हा एकदा राजाच्या झोपडीला भेट देण्यासाठी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी, पन्हाळा कोर्टाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून आमच्या कंपाउंडमध्ये येऊन दुसऱ्या समोरच्या मुख्य फटकाने निघून गेला.
१४ जानेवारीला पुन्हा रात्री २ वाजून ५० मिनिटांनी बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. डॉक्टरांच्या बंगल्यात सज्जा कोठीच्या प्रवेश द्वारामधून आत येऊन तबक उद्यानाकडील प्रवेशद्वारामधून एका दुकानादाराच्या दुकानाच्या पाठीमागील रस्त्यावरून निघून गेला.
कुत्र्याची शिकार न करताच परतला बिबट्या
विशेष म्हणजे या बंगल्यात आजारी असल्याने पळून जाऊ शकत नसलेल्या कुत्र्याच्या पिलावर या बिबट्याने झडप घातली नसल्याने त्याचे आश्चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया डॉ. होळकर यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, त्यांचा आज शिकारीचा अजिबात मूड नव्हता, असे दिसते. कारण त्यांना आमची कुत्री मारणे शक्य होते, तरीही त्यांनी शिकार केली नाही आणि सहज फेरफटका मारून एका फाटकांनी येऊन दुसऱ्या फटकांनी निघून गेला. होळकर यांच्या बंगल्यात असलेली २५ हून अधिक कुत्री बिबट्याने यापूर्वी अनेकदा नेली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बिबट्याचा वावर हा सामान्य
बिबट्याचा गडावरील वावर हा येथील रहिवाशांना सामान्य बाब आहे. पर्यटकांसाठी हा नेहमीच कुतूहलाचा विषय असतो, याउलट पन्हाळगडावर बिबट्या वास्तव्यास असणे ही गडाची शान असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. सध्या गडावर पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ आहे. या वातावरणात गडावर बिबट्याचा वावर आहे त्यामुळे सध्या पायी पन्हाळगडावर फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आहे आले.