पशुधनाच्या रक्षणार्थ वृद्ध दाम्पत्याची बिबट्याशी झुंज; शरीराचे तुकडे, मुलगा घरी आला तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 20:49 IST2025-10-19T20:49:08+5:302025-10-19T20:49:42+5:30
कडवी धरण पाणलोट क्षेत्रातील घटना. पशुधनाच्या रक्षणासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून धरणाशेजारी पाल टाकून चरीतार्थ भागवित होते

पशुधनाच्या रक्षणार्थ वृद्ध दाम्पत्याची बिबट्याशी झुंज; शरीराचे तुकडे, मुलगा घरी आला तेव्हा...
आर.एस.लाड
आंबा: पशुधनाच्या रक्षणार्थ बिबट्याशी झुंज देताना गोलीवणे येथील वयोवृद्ध दाम्पत्याला जीव गमवावा लागला.आज सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.वस्तीपासून सहा किलोमीटर वरील शिवारात बकरीच्या पालात वस्ती करून असलेल्या कंक दाम्पत्य बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले.
निनू यशवंत कंक( वय ७० )व पत्नी रखुबाई (वय ६५ वर्षे) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.हल्ल्यामध्ये रखुबाईचा चेहरा,डावा पाय व उजवा हाताचे लचके तोडलेले कलेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.तर पती निनूचा मृतदेह वाड्यापासून पन्नास मिटरवरील जलाशयाच्या काठावर पडलेला आढळला. त्यांची पांढरी टोपी रक्ताने माखलेली काठावर आढळली. या घटनेने परळे निनावी व उदगिरी पंचक्रोशीत भिंतीचे वातावरण पसरले आहे. याची शाहूवाडी पोलीसात नोंद झाली आहे.
घटनास्थळी व शाहूवाडी पोलीसातून मिळालेल्या माहितीनुसार, परळे निनाई येथील कडवी मध्यम प्रकल्पातून विस्थापित झालेल्या कंक कुटुंबाचे गोळीवणे वसाहतीत राहते घर आहे. तेथे अन्य कुटूंब राहते मात्र निनू व पत्नी रखुबाई पशुधनाच्या रक्षणासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून धरणाशेजारी पाल टाकून चरीतार्थ भागवित होते. पालाच्या दक्षिणेला चुल व वरच्या बाजूला पंचवीस बकरांचे साड बांधलेले आहे. बाहेर चार कुत्री रक्षणार्थ असायची. धरणाच्या काठाने दिवसभर बकरी चारायची अन् रात्रभर त्यांचे जंगली प्राण्यांपासून रक्षण करायचे हा त्यांचा दिनक्रम होता. शुक्रवारी मुलगा सुरेश यांने दिवाळीला घरी या म्हणून सांगून गेला. त्याच रात्री हा हल्ला झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी तिकडे कोणीच फिरकले नव्हते आज सुरेश आई वडीलांना दिवाळीस आणण्यास गेला तर तेथे आई रक्ताच्या थारोळ्यात आढळली तर वडिलांच्या मृतदेह शेजारील जलाशयात तरंगताना दिसला.
वाघ की बिबट्या..?
सदर हल्ल्यात वाघ की बिबट्या याबाबत संभ्रम आहे.मात्र गेल्या महिन्यात येथून पंधरा किलोमीटर अंतरावरील उदगिरी या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात चार वाघांना सोडल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले. दरम्यान शेतकरी संघटनेचे आबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांना वन्यजीव विभागाकडून योग्य ती भरपाई मिळावी म्हणून मृतदेह हलवण्यास विरोध केला.सायंकाळी चार नंतर वरीष्टठांच्या मध्यस्थीनंतर पंचनामा सुरू झाला.
चौकटीसाठी: सणासुदीला निनू वस्तीत यायचे नि पुन्हा रात्रीत पालावर परतायचे.सुरेश त्यांचा एकुलता एक मुलगा शुक्रवारी सकाळी नास्ता घेऊन आला होता.दिवाळीला घरी या म्हणून सांगून आठवडी बाजाराला गेला.एक दिवस आड तो आईवडिलांना भेटून जाई. आज सकाळी पालावर गेला तर ते दिसले नाही.पाठीमागे वळून पाहिले तर आई रक्ताच्या थारोळ्यात दिसली.