आता नवा रोजगार, मुलांना क्लासला सोडा, पैसे कमवा; मेट्रो सिटीचा ट्रेंड कोल्हापुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:32 IST2025-07-11T16:32:16+5:302025-07-11T16:32:35+5:30

अडीच हजारांहून अधिक जण कामाला

Leave the kids to class and earn money More than 2500 people are working in Kolhapur | आता नवा रोजगार, मुलांना क्लासला सोडा, पैसे कमवा; मेट्रो सिटीचा ट्रेंड कोल्हापुरात

AI Generated Image

पोपट पवार

कोल्हापूर : आईवडील दोघेही नोकरी करतात, मग सायंकाळच्या वेळी मुलांना क्लासला कोण सोडणार?, हा प्रश्न शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्भवतो. त्यामुळे अनेकदा मुलांच्या क्लाससाठी दोघांपैकी एकाला काही वर्षांसाठी नोकरीवर पाणी फिरवावे लागते. मात्र, चिंता करू नका, कोल्हापूर शहरात तुमच्या मुलांना क्लासेसला ने-आण करण्यासाठी सायंकाळच्या वेळी रिकाम्या असलेल्या मंडळींनी कमर्शिअल सेवा सुरू केली आहे.

जवळपास अडीच हजारांहून अधिक युवक, महिला ही सेवा देत आहेत. पुणे, मुंबईच्या मेट्रो सिटीत रुजलेला हा नवा ट्रेंड अगदी कमी दिवसांत कोल्हापुरातही आल्याने नोकरी करणाऱ्या दाम्पत्यांची चिंता कायमची मिटली आहे. विशेष म्हणजे या सेवेमुळे अडीच हजारहून अधिकजणांना रोजगारही मिळाला आहे.

तासानुसार ठरतात दर

घरापासून मुलगा किंवा मुलीचा क्लास किती अंतरावर आहे यावर याचे दर ठरत आहेत. साधारणतः तीन हजार रुपयांपासून हे दर आकारले जातात. सायंकाळी ५ वाजता क्लासला सोडून परत ७ वाजता त्यांना आणायला ही मंडळी जातात. क्लासचे तास जितके जास्त तितके याचे दर वाढत जातात.

महिलांना अधिक मागणी

क्लासला जाणाऱ्या मुलींना अनोळखी तरुणाबरोबर क्लासला पाठवण्यासाठी पालक धजावत नाहीत. त्यामुळे जर मुलगी असेल तर हे पालक क्लासला सोडण्यासाठी महिलांचा पर्याय निवडतात. यामुळे या क्षेत्रात महिलांनाही मोठी मागणी आहे.

आई-वडील दोघेही नोकरीला असतील तर त्यांच्या मुलांना क्लासला पाठवण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे अशा गरजूंसाठी सायंकाळच्या मोकळ्या वेळेत आम्ही ही सेवा देतो. सुरक्षितपणे क्लास करून मुलगा घरी येत असल्याने पालकांनाही चिंता नसते. - सुशील खामकर, कोल्हापूर

Web Title: Leave the kids to class and earn money More than 2500 people are working in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.