एकदा ठरलं.. राहुल पाटील ‘हाता’त ‘घड्याळ’ बांधणार; मुंबईत घेतली अजित पवार यांची भेट, याच महिन्यात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:07 IST2025-08-01T17:07:35+5:302025-08-01T17:07:52+5:30
कोल्हापूर : हयातभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ...

एकदा ठरलं.. राहुल पाटील ‘हाता’त ‘घड्याळ’ बांधणार; मुंबईत घेतली अजित पवार यांची भेट, याच महिन्यात प्रवेश
कोल्हापूर : हयातभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, राजेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच त्यांनी गुरुवारी भल्या सकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी ‘देवगिरी’वर भेट घेतली. यावेळी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जवळचे मानले गेलेले पी. एन. पाटील यांचे गतवर्षी निधन झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. परंतु, ते शिंदेसेनेच्या चंद्रदीप नरके यांच्याकडून पराभूत झाले. पी. एन. यांच्या नेतृत्वाखालील कार्यरत होता तो भोगावती साखर कारखाना सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. राजीव गांधी सूतगिरणीलाही मदतीची गरज आहे.
मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी राहुल पाटील हे भाजप किंवा राष्ट्रवादीत जातील, अशा हालचाली सुरू होत्या. त्यातून पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. याच महिन्यात मोठा मेळावा घेऊन अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये पाटील यांचा प्रवेश कार्यक्रम घेण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.
यावेळी श्रीपतराव बोंद्रे बॅंकेचे अध्यक्ष राजेश पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक पी. डी. धुंदरे, सत्यजित पाटील, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील, संचालक ए. डी. चौगुले, करवीर काँग्रसेचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, चेतन पाटील, बी. एच. पाटील वडणगे, भारत पाटील भुयेकर, हंबीरराव वळके, यशवंत बॅंकेचे संचालक दत्तात्रय पाटील उपस्थित होते.
गेले पंधरा दिवस करवीर, गगनबावडा, राधानगरी तालुका आणि कोल्हापूर शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. करवीर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना आणखी जोर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, असा सर्वांचाच आग्रह होता. त्यानुसार निर्णय घेतला. - राहुल पाटील