सरले वर्ष... नव्याचा हर्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:23 AM2018-01-01T00:23:35+5:302018-01-01T00:26:55+5:30

Last year ... new happy! | सरले वर्ष... नव्याचा हर्ष!

सरले वर्ष... नव्याचा हर्ष!

googlenewsNext


कोल्हापूर : डी. जे.च्या ठेक्यावरील बेधुंद नृत्य, गप्पांमध्ये रंगलेल्या पंगती, फटाक्यांची आतषबाजी अशा जल्लोषी वातावरणात सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचा स्वागत सोहळा कोल्हापुरात मध्यरात्रीपर्यंत रंगला. रविवारी रात्री आठ वाजल्यापासूनच अनेकांनी उद्याने, पंचगंगा घाटासह हॉटेल्समध्ये ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी, कुटुंबीयांसमवेत अनेकांनी गर्दी केली होती. एकीकडे वर्षअखेरीनिमित्त अनेकांनी विधायक उपक्रम राबविले; तर नव्या वर्षाच्या विधायक स्वागतासाठीची तयारी सुरू होती.
या वर्षीचा ‘थर्टी फर्स्ट’ वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी अनेकांनी आठवड्यापासूनच नियोजन केले होते. त्यामुळे रविवारी संध्याकाळपासूनच एखाद्या उत्सवासारखेच वातावरण शहरभर दिसत होते. ग्रुप पार्ट्या, कौटुंबिक भोजन, मेजवान्यांची रंगत शहरात रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पंचगंगा घाट, राजाराम बंधारा, कळंबा तलावाचा परिसर, टेंबलाई टेकडी, रंकाळा उद्यान, पद्माराजे उद्यान, नाळे कॉलनी उद्यान, आदी ठिकाणी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. रात्री आठ वाजल्यापासून मित्रमंडळी, कुटुंबीय हे गटागटाने बगीच्यांसह मेजवानीच्या ठिकाणी जमले. या ठिकाणी संगीताची साथ, हसत-खेळत, नृत्य आणि विनोदाच्या संगतीने रात्री उशिरापर्यंत थर्टी फर्स्टची पार्टी रंगली.
शहरातील काही ग्रुपच्या वतीने मोठमोठ्या हॉटेलमध्ये थर्टी फर्स्टचे नियोजन केले होते. त्यांनी आकर्षक विद्युत रोषणाईसह डी.जे., विविध देशी-विदेशी खाद्यपदार्थांची सोय केली होती. त्यामुळे या हॉटेल्ससमोर चारचाकी वाहनांची तोबा गर्दी झाली होती. काहींनी घरीच मित्रमैत्रिणींना बोलावून गच्चीवर नववर्षाचे स्वागत केले. अनेकांनी घरच्या घरी ३१ डिसेंबर साजरा करताना दूरचित्रवाणीवरील विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेतला.

Web Title: Last year ... new happy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.