Kolhapur: आंबोली घाटात दरड कोसळली; रुग्णवाहिका अडकली, प्रवाशांनी वाट करुन दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:01 IST2025-05-22T12:59:46+5:302025-05-22T13:01:24+5:30
आंबोली/नृसिंहवाडी : वळवाच्या जोरदार पावसामुळे आंबोली-गोवा मार्गावर आंबोली धबधब्यापासून काही अंतरावर दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली ...

छाया-प्रशांत कोडणीकर
आंबोली/नृसिंहवाडी : वळवाच्या जोरदार पावसामुळे आंबोली-गोवा मार्गावर आंबोली धबधब्यापासून काही अंतरावर दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यानच या मार्गावर रुग्णवाहिका अडकली. यावेळी प्रवाशांनी थांबून रस्त्यावरील दगड बाजूला करुन रुग्णवाहिकेला वाट करून दिली.
जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे आंबोली धबधबा प्रवाहित झाला आहे. मान्सून सुरू झाल्यासारखी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने काहीसा गारठा जाणवत आहे. या पावसाने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
साधारणता वळीव पाऊस सायंकाळी येऊन लगेच जात होता; मात्र यंदा वरुणराजाच्या मनात काही वेगळेच दिसत आहे. पावसाळ्यासारखे वातावरण झाले आहे. जुलै, ऑगस्टमधील पावसाचा अनुभव कोल्हापूरकरांना येत आहे. दिवसभर हवेत गारठा जाणवत होता. सततच्या पावसाने शेतीची कामे ठप्प झाली आहेत.
हा पाऊस ऊस पिकांना पोषक असला तरी अनेक ठिकाणी उसाची लागणी भरणीचे काम थांबले आहे. मान्सून तोंडावर आल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. भात, सूर्यफूल, भुईमूग ही पिके अद्याप शिवारातच उभी आहेत. त्यांची काढणी करता येत नसल्याने नुकसान होत आहे. आगामी तीन-चार दिवस पावसाचे असल्याचा अंंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.