'शक्तिपीठ'साठी कोल्हापूर जिल्ह्यातील मोजणीस प्रशासन दचकून, विरोधाचा घेतला धसका

By भीमगोंड देसाई | Updated: June 21, 2025 17:21 IST2025-06-21T17:20:08+5:302025-06-21T17:21:40+5:30

भरपाईची रक्कम जाहीर नसल्याने संभ्रम

Land in Kolhapur district required for Nagpur-Goa Shaktipeeth highway not counted | 'शक्तिपीठ'साठी कोल्हापूर जिल्ह्यातील मोजणीस प्रशासन दचकून, विरोधाचा घेतला धसका

'शक्तिपीठ'साठी कोल्हापूर जिल्ह्यातील मोजणीस प्रशासन दचकून, विरोधाचा घेतला धसका

भीमगोंडा देसाई

कोल्हापूर : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी लागणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील जमीन मोजणीचा श्रीगणेशाच अजून झालेला नाही. महामार्गाला बाधित शेतकरी, विविध संघटनांनी विरोध केल्याने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, भूमी अभिलेख प्रशासनाने अजून मोजणीची प्रक्रिया सुरू केलेली नाही. शेजारी सांगलीत येत्या बुधवारपासून मोजणी होणार आहे. पण कोल्हापुरात अजून यासंबंधीच्या कोणत्याही हालचाली नाहीत. भरपाईची रक्कम जाहीर करा आणि मगच आमच्या शेतात या, अशी भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेतल्याने जिल्ह्यात सध्या वेट ॲन्ड वॉच अशा भूमिकेत यंत्रणा आहे, असे महामंडळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग ८०२ किलोमीटर लांबीचा प्रस्तावित आहे. सांगली, कोल्हापूरसह बारा जिल्ह्यातून महामार्ग जाणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार हा महामार्ग करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे.

गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना महामंडळास दिल्या आहेत. दरम्यान, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांचा विरोध तीव्र असल्याने प्रशासन कात्रीत सापडले आहे. सांगलीत बुधवारपासून मोजणी करण्याचे जाहीर केले आहे.

पण विरोधामुळे ही मोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल की नाही, याबद्दल महामंडळाच्या अधिकाऱ्यांतही शंका आहे. यापूर्वी विरोध झाल्याने मोजणीची प्रक्रिया झाली नसल्याने त्यांच्या मनात यावेळीही शंका निर्माण झाली आहे. शेजारच्या सांगलीपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात विरोधाची तीव्रता अधिक असल्याने प्रशासन दचकून आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रस्तावित महामार्ग..

  • महामार्गाची रुंदी : सहा पदरी, ३०० फूट रुंद
  • बाधित गावे : ६०
  • बाधित जमीन : ५ हजार २०० एकर.

Web Title: Land in Kolhapur district required for Nagpur-Goa Shaktipeeth highway not counted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.