कोल्हापुरातील अंबाबाई विकास आराखडा भूसंपादन मार्चपासून सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:46 IST2026-02-18T13:46:17+5:302026-02-18T13:46:41+5:30

मिळकतधारकांशी चर्चा करूनच निर्णय : बिंदू चौक ते मेन राजाराम परिसर संपादनाचा विचार

Land acquisition for Ambabai Development Plan in Kolhapur to begin from March | कोल्हापुरातील अंबाबाई विकास आराखडा भूसंपादन मार्चपासून सुरु होणार

संग्रहित छाया

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत केल्या जाणाऱ्या भूसंपादनासाठीची प्रक्रिया मार्चपासून सुरू होणार आहे. नगरविकास विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर आठवड्याभरात मंजुरी आल्यानंतर परिसरातील मिळकतधारकांशी संपादनाबाबत चर्चा केली जाणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पुनर्वसन की नुकसानभरपाईची रक्कम या दोन पर्यायांवर नागरिकांच्या मागणीनुसार निर्णय घेतले जातील. याशिवाय आराखड्यात बदल करून बिंदू चौक ते मेन राजाराम हायस्कूलपर्यंतचा परिसरदेखील संपादित करायचा. हा रस्ता हेरिटेज पथ म्हणून विकसित करून खाली दोन-तीन मजली पार्किंग आणि वर तेथील व्यावसायिक, रहिवाशांचे पुनर्वसन असाही विचार सुरू आहे.

श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत मंदिराच्या भोवतीच्या ९ एकर परिसरातील मिळकतींचे संपादन केले जाणार आहे. ते कसे करता येईल यावर जिल्हास्तरीय समितीने आपला अहवाल राज्य शासन स्तरावर नियुक्त केलेल्या भूसंपादन समितीला पाठविला आहे. पुढील आठवड्याभरात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

मंजुरी येताच संपादित केल्या जाणाऱ्या जागांचे प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण, मोजणी आणि नागरिकांशी संवाद या तीन पातळीवर मार्च-एप्रिलमध्ये काम सुरू होणार आहे. या सर्वेक्षणामुळे किती जमीन संपादित होते. किती मिळकतदार बाधित होतात याचा नेमका आकडा समजणार आहे.

मिळकतधारकांपुढे दोन पर्याय

नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला पुनर्वसन किंवा रोख रक्कम असे दोन पर्याय दिले आहेत.
अंबाबाई मंदिर परिसरात रहिवाशांपेक्षा व्यावसायिकांची संख्या जास्त असून, त्यांचे तसेच काही रहिवासी अंबाबाईच्या नित्य नैमित्तिक विधींशी संबंधित असल्याने त्यांचेही तेथेच पुनर्वसन करावे लागणार आहे. नागरिकांनी रोख रक्कम किंवा पुनर्वसन यापैकी एक पर्याय निवडायचा आहे.

आराखड्याचे नागरिकांपुढे सादरीकरण

अंबाबाई आराखड्यात अनेक बदल आणि दुरुस्त्या केल्या जात आहेत. अडचणीचे, सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याच्या ठरणाऱ्या बाबी काढून नव्या सोयीच्या बाबींचा समावेश केला जाणार आहे. या सर्व बदलांचा सविस्तर आराखडा मिळकतधारकांसमोर सादर केला जाणार आहे. त्यांची मते जाणून घेऊनच आराखड्याचे पुढचे पाऊल टाकले जाईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.

बिंदू चौक ते मेन राजाराम परिसर हेरिटेज पथ

  • बिंदू चौक सबजेल हलवून ही इमारत भाविकांच्या सोयीसाठी वापरता येईल.
  • बिंदू चौक ते मेन राजाराम हायस्कूलपर्यंतचा रस्ता अरुंद असून, वाहने व भाविकांमुळे कायमच येथे वाहतुकीची कोंडी होते.
  • हा रस्ता हेरिटेज पथ करून खाली पार्किंग आणि वर मिळकतधारकांचे पुनर्वसन असा विचार आहे. त्यामुळे पार्किंगची सोय होईल. भाविकांना सोयीसुविधा मिळतील. चालत मंदिरापर्यंत जाता येईल, मिळकतधारकांनाही बाधा येणार नाही, असा विचार करून मिळकतधारकांशी चर्चा केली जाणार आहे.


दर्शन मंडप सरलष्करमध्ये

अंबाबाई मंदिराच्या विद्यापीठ गेट येथील नियोजित भूमिगत पार्किंग व दर्शन मंडप रद्द करण्यात आले आहे. ही परिसर मोकळाच ठेवला जाईल. दर्शन मंडप सरलष्कर भवनमध्ये होईल. बिंदू चौकातील जमीन संपादित करून तेथे पार्किंग वाढवले जाईल.

प्राधान्यक्रम असा..

  • सरलष्करमध्ये दर्शन मंडप साकारणे
  • पार्कींग वाढवणे
  • मंदिराभोवतीच्या मिळकतींचे संपादन

Web Title : कोल्हापुर अंबाबाई मंदिर विकास योजना: मार्च में भूमि अधिग्रहण शुरू

Web Summary : कोल्हापुर में अंबाबाई मंदिर विकास योजना के लिए भूमि अधिग्रहण मार्च में शुरू होगा। संपत्ति मालिकों के पास पुनर्वास या मुआवजे का विकल्प होगा। पार्किंग और पुनर्वास सहित एक विरासत पथ विकास का भी प्रस्ताव है।

Web Title : Kolhapur Ambabai Temple Development Plan: Land Acquisition to Begin in March

Web Summary : Ambabai Temple development plan in Kolhapur is set to begin land acquisition in March. Property owners will have options for resettlement or compensation. A heritage path development is also proposed, including parking and rehabilitation.