कोल्हापूर : जर्मनीच्या सुहल येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेत कोल्हापूरची नेमबाज शांभवी श्रावण क्षीरसागर हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात ६३३.१ स्कोर करून सुवर्णपदक जिंकले.
शूटिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शांभवीने जर्मनीतील या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याच स्पर्धेत भारताच्या ओजस्वी ठाकूरने रौप्यपदक पटकावले. क्षीरसागरचे यश विशेष ठरले कारण तिने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती आणि सहकारी ओजस्वी ठाकूरच्या जबरदस्त आव्हानाचा सामना करत तिने आघाडी कायम राखली. स्पर्धेची सुरुवात क्षीरसागर, ठाकूर आणि चीनच्या ली शिजिया यांनी चांगली केली होती, तर इटलीच्या कार्लोटा सालाफिया आणि चीनच्या ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या हुआंग युटिंग यांनीही चांगली कामगिरी केली. या विजयामुळे भारताने एकूण ८ पदकांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असून त्यामध्ये २ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.
याआधी दिवसभरात नरन प्रणव वनीता सुरेश यांनी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्यपदक जिंकून भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले, त्यानंतर मुकेश नेलवल्ली यांनी पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकत त्याची पुनरावृत्ती केली. शांभवी कोल्हापुरातील सक्सेस शुटिंग अकादमीची खेळाडू असून तिला तिचे वडील श्रावण आणि आई अर्चना यांचे प्रोत्साहन लाभले. प्रशिक्षक संतोष जाधव यांनी तिच्यावर मेहनत घेतली. तिच्या या यशाबद्दल तिचे देशभर कौतुक होत आहे.
शांभवीने आपल्या कोल्हापूरचे, महाराष्ट्राचे, देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. हे सर्व शांभवीच्या मेहनतीचे फळ असून ते देशासाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या या यशाबद्दल शांभवीचे आणि तिच्या पालकांचे अभिनंदन.
-संतोष जाधव, प्रशिक्षक.