राज्यातील मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे नद्यांना पूर आले असून शेतात, घरात पुराचे पाणी शिरले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हाती आलेली पिके मातीमोल झाली आहेत. भर पावसात उभे गाव ओस झाले. अशी स्थिती राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पाहायला मिळते आहे. दरम्यान, आता राज्यभरातून मदतीसाठी ओघ सुरू झाला आहे. माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनीही कोल्हापूरकरांना मराठवाड्याच्या मदतीसाठी आवाहन केले आहे.
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
"सध्या मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्नं आणि भविष्य सगळंच वाहून गेलं आहे. कोल्हापूरकरांनो, आपणही महापुराचा वेदनादायक अनुभव घेतलाय. महापुराच्या काळात देशभरातून मदतीचा हात मिळाला होता. आज आपली वेळ आहे, ही आपली जबाबदारी आहे. तुमची छोटीशी मदतही पुरग्रस्तांसाठी जीवनरेखा ठरेल. मराठवाडा पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी चला, मदतीचा हात पुढे करूया! आपली मदत आज दि. 24 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत जमा करा. 29 तारखेला मदतीचा ट्रक मराठवाड्याकडे रवाना होईल', असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.
मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यातही मोठे नुकसान
नद्यांना पूर आल्याने शेती, घरे, जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने घरांचे आणि व्यवसायांचेही मोठे नुकसान झाले आहे. डोळ्यांदेखत शेतांमधील पिकांचे होत्याचे नव्हते झाल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘गंगामाई पाहुणी आली, घरट्यात गेली राहून...’ अशी अवस्था झालेल्या शेतकऱ्यांचा कणा याही बिकट स्थितीत ताठ राहावा, यासाठी राज्य सरकारने तातडीने त्यांना मदत देऊन जगण्याची उभारी द्यावी, अशी मागणी होत आहे.
माढा तालुक्यातील सुलतानपूर, दारफळ, वकाव व मुंगशी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी बचावकार्याला वेग आला आहे. कालपासून सुरू असलेल्या मोहिमेत काही नागरिकांची सुटका करण्यात आली असून उर्वरितांसाठी आर्मी व एनडीआरएफचे पथक सक्रीय आहे. सकाळी साडेनऊ दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापुरात येऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.