कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शाळा सुधारणा मॉडेल राज्यभरात, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 11:58 IST2025-09-22T11:57:49+5:302025-09-22T11:58:26+5:30
पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत कोल्हापूरचीच चर्चा

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शाळा सुधारणा मॉडेल राज्यभरात, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्याशाळांचा गुणात्मक आणि सुविधात्मक सर्वांगीण विकास करण्यासाठी कोल्हापूरजिल्हा परिषदेने राबविलेले शाळा सुधारणा मॉडेल राज्यभरात लागू करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली.
बालेवाडी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी उत्तम सादरीकरण आणि उत्तम याेजनांच्या अंमलबजावणीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, ‘डायट’चे तत्कालीन प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, कोल्हापूर महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार, इचलकरंजी महापालिकेेचे शिक्षणाधिकारी भिकाजी कासार उपस्थित होते.
दादा भुसे म्हणाले, परख, आधार पडताळणी, अपार आयडी तयार करणे, सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही, पायाभूत आणि क्रीडा सुविधा, पदोन्नती या सर्वच बाबतीत कोल्हापूर जिल्हा परिषद अग्रेसर असून, त्यांचे हे सर्व उपक्रम, योजना आणि कार्य राज्यासाठी दिशादर्शक आहे. यातील अनेक उपक्रम हे राज्यभरात राबविले जाणार आहेत.
यावेळी सविस्तर सादरीकरण करताना कार्तिकेयन म्हणाले, समृद्ध शाळा या उपक्रमांतर्गत आम्ही पाच वर्षांचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे दुर्गम भागातील शाळा, अतितत्काळ दुरुस्तीच्या शाळा अशी वर्गवारी केली आहे. ‘मिशन शाळा कवच’मध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. ‘मिशन सूर्यकिरण’ अंतर्गत सौरऊर्जेचा वापर वाढवण्यात येणार आहे. मिशन उत्कर्षमध्ये आम्ही राज्यात पहिले आलो आहोत. आता देशात पहिला येण्यासाठी नियोजन सुरू आहे.
परिषदेत कोल्हापूरचीच चर्चा
कार्तिकेयन एस. हे तामिळनाडूमधील असूनही त्यांनी सर्व सादरीकरण उत्तम पद्धतीने मराठीमध्ये सादर केले. स्पष्ट संकल्पना, त्याच्यासाठी आकडेवारीचा वापर आणि एकापेक्षा एका उपक्रमाची प्रभावी मांडणी यामुळे कार्तिकेयन यांच्या सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. दोन दिवसांच्या या परिषदेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्याच उपक्रमांची चर्चा सुरू होती.