कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण प्रक्रिया लांबणार; नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवर हरकती सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:43 IST2025-09-05T18:41:41+5:302025-09-05T18:43:10+5:30
रचनेबाबत १५ सप्टेंबरला सुनावणी

कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण प्रक्रिया लांबणार; नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवर हरकती सादर
कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीची बहुप्रतीक्षित असलेली आरक्षण प्रक्रिया किमान १५ सप्टेंबरपर्यंत होणार नसल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. कारण, मतदारसंघ रचनेबाबतची पुढची सुनावणी १५ सप्टेंबरला होणार असून, तोपर्यंत कोणतीही प्रक्रिया राबविणार नसल्याचे याआधीच सरकारी वकिलांनी स्पष्ट केले आहे.
करवीर, कागल आणि आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाच्या रचनेबाबत येथील सर्किट बेंचसमोर सुनावणी सुरू आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाकडून अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली असून, आता पुढची सुनावणी १५ सप्टेंबरला होईल.
सरकारकडून ॲड. अनिल साखरे आणि राज्य निवडणूक आयोगाकडून ॲड. सचिंद्र शेटे आणि ॲड. अतुल दामले यांनी काम पाहिले. याआधीच्या सुनावणीमध्ये जोपर्यंत या याचिकेला निकाल लागणार नाही, तोपर्यंत या निवडणुकीची कोणतीही पुढची प्रक्रिया करणार नसल्याची हमी सरकारी वकिलांनी दिली होती. त्यामुळे आता आरक्षण प्रक्रिया सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत पुढे गेल्याचे मानले जाते.
नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवर हरकती सादर
जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेवर ९२ हरकती दाखल झाल्या आहेत. त्या हरकतींवर दि. ८ सप्टेंबरपर्यंत सुनावणी घेऊन प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सादर केल्या जाणार आहेत. त्यांच्या मान्यतेनंतर मुख्याधिकारी अंतिम प्रभाग रचना जाहीर करतील. जिल्ह्यातील दहा नगरपालिकांपैकी आठ नगरपालिकांतील प्रभाग रचनांवर ६७ हरकती आल्या आहेत.
प्रांताधिकारी यांच्याकडे या हरकतींवर सुनावणी सुरू असून त्यानंतर ९ ते ११ तारखेदरम्यान प्रभाग रचना नगरविकास विभागाला सादर केली जाईल. विभागाकडून ती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाईल. आयोगाच्या मान्यतेने मुख्याधिकारी २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर करतील.
नगरपालिकांसाठी आलेल्या हरकती
मलकापूर : २१
हुपरी : १६
शिरोळ : १०
जयसिंगपूर :७
पन्हाळा : ६
कागल आणि वडगाव : प्रत्येकी ३,
गडहिंग्लज : १
नगरपंचायतींसाठी आलेल्या हरकती
हातकणंगले : १९
चंदगड : ४
आजरा : २