कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलेसाठी खुले; ४ सभापतीपदे खुली, तर ३ महिलांसाठी खुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 12:18 IST2025-09-13T12:17:50+5:302025-09-13T12:18:24+5:30
आतापर्यंतच्या महिला अध्यक्ष..जाणून घ्या

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलेसाठी खुले; ४ सभापतीपदे खुली, तर ३ महिलांसाठी खुली
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलेसाठी खुले झाले आहे. ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर २०२५ रोजी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. आतापर्यंत पाच महिलांनी कोल्हापूरजिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांपैकी ४ सभापतीपदे ही सर्वसाधारण गटासाठी खुली असून, ३ पदे महिलांसाठी खुली आहेत. या प्रमुख पदांच्या आरक्षणामुळे साहजिकच जिल्ह्यातून मोठी राजकीय चुरस पहावयास मिळणार आहे.
राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदे आणि ३२१ सभापतीपदांसाठीचे आरक्षण या अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाले आहे. असे असले, तरी या पदावर कोणत्याही प्रवर्गातील महिला निवडली जाऊ शकते.
जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांपैकी ४ पंचायत समित्यांची सभापतीपदे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून, ३ सभापतीपदे महिलांसाठी राखीव आहेत. इतर मागास महिलांसाठी २, सभापतीपदे राखीव असून, इतर मागास प्रवर्गासाठी, अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आणि अनुसूचित जातीसाठी प्रत्येकी १, अशी एकूण ३ सभापतीपदे राखीव ठेवण्यात आली आहेत.
जरी सर्वसाधारण महिलेसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले झाले असले, तरी या पदावर कोणत्याही प्रवर्गातील महिला निवडली जाऊ शकते. मात्र, असे अपवादात्मक स्थितीमध्ये होते. याआधीही २०१७ साली अध्यक्षपद सर्वसाधारणसाठी खुले असताना शौमिका महाडिक या अध्यक्ष झाल्या होत्या.
जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतच्या महिला अध्यक्ष
- नंदा पोळ, ता. शिरोळ २१ मार्च १९९७ ते २० मार्च १९९८
- पुष्पमाला जाधव, कुदनुर ता. चंदगड २१ मार्च १९९८ ते २० मार्च १९९९
- यशोदा कोळी, उदगाव ता. शिरोळ१ डिसेंबर २००९ ते २० मार्च २०१२
- विमल पाटील, आमशी ता. करवीर२१ सप्टेंबर २०१४ ते २० मार्च २०१७
- शौमिका महाडिक, पुलाची शिरोली ता. हातकणंगले २१ मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१९
पत्नी, सुना रिंगणात
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाल्यानंतर आता त्यादृष्टीने नेते मंडळींचीही मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. एकदा का जिल्हा परिषदेचे आरक्षण पडले की मग त्यादृष्टीने जोडण्या घालण्यात येणार आहेत. त्यामुळे नेते किंवा प्रमुख कार्यकर्ते यांच्या पत्नी, सुना अधिक संख्येने निवडणूक रिंगणात दिसण्याची शक्यता आहे.