बोगस प्रमाणपत्र देणारे शिक्षक अन् योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या लाडक्या बहिणी गोत्यात, कोल्हापूर जिल्ह्यात किती.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 19:13 IST2025-08-26T19:11:04+5:302025-08-26T19:13:52+5:30

जि.प. साईओंनी दिले चौकशीचे आदेश

Kolhapur Zilla Parishad CEO orders to investigate teachers who submitted bogus certificates for transfer and female employees who took advantage of Ladki Bahin scheme | बोगस प्रमाणपत्र देणारे शिक्षक अन् योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या लाडक्या बहिणी गोत्यात, कोल्हापूर जिल्ह्यात किती.. जाणून घ्या

बोगस प्रमाणपत्र देणारे शिक्षक अन् योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या लाडक्या बहिणी गोत्यात, कोल्हापूर जिल्ह्यात किती.. जाणून घ्या

कोल्हापूर : बदलीसाठी दिव्यांग आणि आजारपणाची प्रमाणपत्रे सादर करणारे जिल्ह्यातील ३५६ प्राथमिक शिक्षक आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या २३ महिला कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिले आहेत. याआधी तालुका पातळीवर कोड स्कॅन करून खातरजमा केल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत होते. मात्र, तक्रारी वाढतच निघाल्याने हा चौकशीचा निर्णय घेण्यात आला.

‘लाडकी बहिणी’ योजनेतून राज्यातील जिल्हा परिषदांच्या ११०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेतल्याचे उघडकीस आले आहे. याची आकडेवारी राज्याकडून जिल्हा परिषदांना पाठविण्यात आली आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २३ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता या कर्मचारी जिल्हा परिषद मुख्यालयातील आहेत की, पंचायत समितीमधील याची छाननी करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व विभागांना पत्रे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शिक्षकांच्या बदलीमध्ये ‘संवर्ग १’ मध्ये दिव्यांग आणि गंभीर आजार असलेल्या शिक्षकांना सूट दिली जाते. १२ शारीरिक आजारांपैकी व्याधीग्रस्त व दिव्यांग शिक्षक या विशेष तरतुदीचा लाभ घेतात. अशा ३५६ शिक्षकांपैकी काहींनी बाेगस प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कार्तिकेयन यांनी या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठांता यांच्याकडे ही सर्व प्रकरणे वर्ग करून या प्रमाणपत्रांची छाननी करण्याची मागणी जिल्हा परिषदेने केली आहे.

दिव्यांग, गंभीर आजार प्रमाणपत्रानुसार लाभ घेतलेल्या शिक्षकांची तालुकावार संख्या

  • करवीर - ६१
  • शिरोळ - ६१
  • हातकणंगले - ४०
  • राधानगरी - ३९
  • गडहिंग्लज - २५
  • कागल - २४
  • पन्हाळा - २४
  • भुदरगड - २३
  • आजरा - २०
  • शाहूवाडी - २०
  • चंदगड - १२
  • गगनबावडा - ०७
  • एकूण - ३५६

शिक्षक बदली प्रक्रियेदरम्यान ज्यांनी दिव्यांग आणि गंभीर आजार याबाबत प्रमाणपत्रे सादर केली आहेत. त्याबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे याची खात्री करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांचीही चौकशी त्वरित करण्यात येत आहे. - कार्तिकेयन एस. , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

Web Title: Kolhapur Zilla Parishad CEO orders to investigate teachers who submitted bogus certificates for transfer and female employees who took advantage of Ladki Bahin scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.