कोल्हापूर : सुभाषनगरमध्ये तलवार हल्ला; दोघे जखमी घरावर दगडफेक; वाढदिवसाच्या फटाक्यांचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:27 IST2018-11-28T11:25:59+5:302018-11-28T11:27:15+5:30
वाढदिवशी रात्री फटाके वाजवल्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मंगळवारी सुभाषनगरमध्ये तलवार हल्ला व घरावर दगडफेक करण्यात झाले.

कोल्हापूर : सुभाषनगरमध्ये तलवार हल्ला; दोघे जखमी घरावर दगडफेक; वाढदिवसाच्या फटाक्यांचे कारण
कोल्हापूर : वाढदिवशी रात्री फटाके वाजवल्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मंगळवारी सुभाषनगरमध्ये तलवार हल्ला व घरावर दगडफेक करण्यात झाले. यामध्ये वासीम अल्लाबक्ष मुजावर (वय ३३) आणि इरफान अल्लाबक्ष मुजावर (२९) हे दोघे जखमी झाले.
सुभाषनगरमधील सिरहाज मोहल्ला येथे सोमवारी अरबाज नावाच्या युवकाचा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री १२ वाजता फटाके वाजवण्यात आले. यामुळे वासिमची मुलगी झोपेतून जागी झाली. त्यामुळे वासीम व इरफान हे दोघे भाऊ अरबाजला जाब विचारण्यासाठी गेले. तेथे धक्काबुक्कीही झाली. मात्र, भांडण मिटवण्यात आले.
मंगळवारी सकाळीही काही ज्येष्ठ मंडळींनी हा वाद मिटवून टाकला. मात्र, रात्री साडेआठच्या सुमारास ३० ते ४० जणांनी मुजावर यांच्या घरावर दगडफेक केली, त्यांना तलवारीने मारहाण केली, घराची नासधूस केली. यामध्ये इरफानच्या नाकाला, तर वासीमच्या डोक्याला जखम झाली आहे. याप्रकरणी अन्वर शेख, सिद्धिक शेख, रफिक शेख, मुजवकील शेख या चौघांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या दोघा जखमींवर रात्री सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले.