कोल्हापूर : गाळपाचा वेग वाढला, उतारा घटला, २0 दिवसांत २५ टक्के उसाची तोडणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 15:02 IST2018-12-01T15:00:31+5:302018-12-01T15:02:35+5:30
यंदा कोयता आणि मशीन यांचा एकाचवेळी रपाटा सुरू झाल्याने साखर कारखान्याच्या गाळपाचा वेग वाढला आहे. कारखाने सुरू झाल्याच्या १५ ते २0 दिवसांंतच २५ टक्के क्षेत्रावरील तब्बल २0 लाख मेट्रीक टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे.

कोल्हापूर : गाळपाचा वेग वाढला, उतारा घटला, २0 दिवसांत २५ टक्के उसाची तोडणी पूर्ण
नसीन सनदी
कोल्हापूर : यंदा कोयता आणि मशीन यांचा एकाचवेळी रपाटा सुरू झाल्याने साखर कारखान्याच्या गाळपाचा वेग वाढला आहे. कारखाने सुरू झाल्याच्या १५ ते २0 दिवसांंतच २५ टक्के क्षेत्रावरील तब्बल २0 लाख मेट्रीक टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. तोडणी लवकर होत असली, तरी उसाच्या उताऱ्यात ४0 टक्क्यांपर्यंत घट दिसत आहे. जेथे एकरी ६0 टन मिळायचे, तेथे कसेबसे रडतखडत ३५ ते ४0 टनापर्यंत आकडा जात असल्याने ऊस उत्पादकांना निम्म्याहून अधिक रकमेचे नुकसान सहन करावे लागत आहे.
जिल्ह्यात आजच्या घडीला २१ कारखान्यांना लावण व खोडव्यासह जवळपास २ लाख ५0 हजार हेक्टरवरील ऊस तोडणीसाठी उपलब्ध आहे. यातून ९४ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. या वाढीव क्षेत्राच्या तोडणीसाठी परजिल्ह्यातील मजुरांवर अवलंबून राहणे गेल्यावर्षी महागात पडल्याने यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी तोडणी मशिनचा वापर सुरू केला आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी तोडणी मजुरांची संख्याही १0 हजारांपर्यंत गेली आहे.
तोडणी वेग वाढला असला, तरी उत्पादनात लक्षणीय घट दिसत आहे. जून ते आॅगस्ट अशा तीन महिन्यांत सलग पाऊस पडल्याने सूर्यप्रकाशाअभावी उसाची अपेक्षित वाढच झालेली नाही. त्यातच महापुरामुळेही पीक हातचे गेले आहे.
हुमणी आणि लोकरी मावा व तांबेºयाने उसाच्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. बºयाच ठिकाणी हुमणी व माव्यामुळे ऊस अर्धवट वाळला आहे. परतीचा पाऊसही न झाल्याने पीक वाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. साहजिकच तोडणी करताना उसाचे वजन भरेनासे झाले आहे.
ज्या क्षेत्रावर २0 टन ऊस निघायचा तेथे नऊ ते १0 टनांवर समाधान मानावे लागत आहे. एकरी उतारा ३0 ते ३५ टनांपर्यंत खाली आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करून उत्पादन एकरी ६0 टनाच्या पुढे गेले होते, यावर्षी त्याला निसर्गानेच खीळ घातली आहे. एफआरपी तीन हजारावर गेली, तरी उतारा निम्म्यावर आल्याने शेतकऱ्याच्या पदरात मात्र निम्मेच पैसे येणार आहेत.
प्रती एकरी ४0 टन उतारा धरला, तर १ लाख २0 हजार रुपये मिळतात. त्यातून एकरी ७५ ते ८0 हजार रुपये खर्च वजा करता शेतकऱ्यांच्या हातात ४0 हजार रुपयेच राहत आहेत. १८ महिन्यांच्या मेहनतीला एवढेच मिळत असल्याने शेतकरी अस्वस्थ आहे.
गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, चंदगड, आजरा या अतिपावसाच्या तालुक्यांमध्ये तर ऊस पूर्णपणे खुंटला आहे. तीच गत कागल, करवीरमध्ये दिसत आहे. येथे पाण्याचा निचरा होणाऱ्या ठिकाणी ऊस बऱ्यापैकी असला, तरी पाणथळ ठिकाणी उसाचे वजन मिळेनासे झाले आहे.
गडहिंग्लजमध्ये उसाचे चिपाडेच झाल्याचे दिसत आहे. हातकणंगले व शिरोळमध्ये तुलनेने चांगली परिस्थिती असली, तरी तेथेही हुमणी व लोकरी माव्याचा मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांचा हंगाम इको केनचा २४ नोव्हेंबरचा अपवाद वगळता, उर्वरित १९ कारखाने ऊसदर आंदोलन मिटल्यानंतर लगेचच ११ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत सुरू झाले आहेत.
जिल्ह्यातील १४ सहकारी आणि ७ खासगी अशा २१ कारखान्यांकडून प्रतिदिन १ लाख १९ हजार ३00 मेट्रीक टनाप्रमाणे आतापर्यंत १९ लाख ९३ हजार ५७0 मेट्रीक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. सरासरी १0.२0 टक्के उताºयाने १८ लाख ३८ हजार मेट्रीक टन साखर उत्पादित झाली आहे.
उसाचे वजन घटल्याचा फटका शेतकऱ्याबरोबरच कारखान्यांनाही बसला आहे. उसाची उपलब्धता कमी झाल्याने गळीत हंगाम मार्चपर्यंत तरी जाईल की नाही याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.
१६0 ते १८0 दिवस हंगाम चालला तरच कारखान्यांना फायदा होतो. आताचा वेग व उसाची गुणवत्ता पाहता डिसेंबरमध्येच निम्मा उस संपणार आहे. जानेवारीनंतर उसासाठी कारखान्यांना शोधाशोध करावी लागणार असल्याचे दिसत आहे.