कोल्हापूरकरांना उन्हाळ्यातही मिळणार मुबलक पाणी, थेट पाईपलाईन पुरवठा खंडित झाला तरी होणार पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:26 IST2025-11-14T18:25:51+5:302025-11-14T18:26:25+5:30
अत्याधुनिक पंपसेटमुळे यंत्रणा

कोल्हापूरकरांना उन्हाळ्यातही मिळणार मुबलक पाणी, थेट पाईपलाईन पुरवठा खंडित झाला तरी होणार पाणीपुरवठा
कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत महानगरपालिकेने शिंगणापूर रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथील पुईखडी फिल्टर हाऊससाठी अत्याधुनिक पंपसेट बसवले आहेत. नव्या पंपसेटमुळे त्याचबरोबर नव्याने बसवण्यात येणाऱ्या आणखी दोन पंपांमुळे काळम्मावाडी योजनेमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तरीही शहराचा पाणीपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवणे शक्य होणार आहे.
शिंगणापूर येथे पूर्वीचे ४३५ हॉर्सपॉवरचे तीन पंपसेट जुने झाल्याने त्यांचे आयुर्मान संपले होते. त्याऐवजी आता ५४० एचपी क्षमतेचे तीन नवे पंपसेट बसवण्यात आले आहेत. अमृत योजनेतून बांधण्यात आलेल्या ११ पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटनही होत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या सलग बैठका घेतल्या. त्यामध्ये त्यांनी नागरिकांना दररोज नियमानुसार आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले पाहिजे, त्यासाठी कोणतीही कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले होते.
आमदार सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईन योजना पूर्ण केली. या योजनेमुळे शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल, असे वाटत असतानाच वितरणातील त्रुटी आणि पर्यायी व्यवस्थेअभावी पाणीटंचाईचा ससेमिरा कायम राहिला होता.
शिंगणापूर पंपिंग स्टेशनवर तीन नवीन मोटरपंप बसवण्यात आल्यामुळे आता ए, बी व ई वॉर्डातील निम्म्या भागाला पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत शिंगणापूर पंपिंग स्टेशनवरील बावडा फिल्टर हाऊससाठीही जुन्या ५४० एचपी पंपसेटऐवजी ७१० एचपी क्षमतेचा नवीन पंपसेट बसवण्यात येणार आहे. त्यामुळे ई वॉर्डातील कसबा बावड्यासह बापट कॅम्प, कदमवाडी, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी आदी भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
नव्या तांत्रिक सुधारणा पूर्ण झाल्यानंतर शहरात उन्हाळ्यातही पाण्याची टंचाई भासणार नाही. थेट पाईपलाईनचा पुरवठा खंडित झाला तरी शिंगणापूर आणि बालिंगा पंपिंग स्टेशनवरून २४ तास अखंड पाणीपुरवठा सुरू राहील, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
बालिंगा येथे दोन नवे पंप
नागदेववाडी पंपिंग स्टेशनकडील बालिंगा फिल्टर हाऊस येथेही सुधारणा करण्यात येत आहे. जुन्या २०० एचपी पंपसेटचे आयुष्य संपल्याने, तेथे नवीन २०० एचपी पंपसेट बसवण्यात येणार आहे. यामुळे बालिंगा शहराच्या सी व डी वॉर्डात नियमित पाणीपुरवठा होणार आहे. हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.