Happy New Year 2026: जल्लोषात निरोप..नव्याचे स्वागत; थर्टी फर्स्टला कोल्हापूरकरांत रात्री उशिरापर्यंत उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:53 IST2026-01-01T11:50:59+5:302026-01-01T11:53:14+5:30
निरभ्र आसमंतात फटाक्यांची आतषबाजी

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : सरत्या वर्षाने अनेक सुखद आठवणींची शिदोरी दिली.. दु:खाने, संघर्षाने अनुभवाची गाठ अधिक घट्ट केली.. एका डोळ्यात आसू.. एका डोळ्यात हसू देणाऱ्या साल २०२५ ला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना मध्यरात्रीच्या या वळणावर कोल्हापूरकर बुधवारी विसावले. कुटुंबीय, मित्र मैत्रिणी, आप्तेष्टांसह मध्यरात्री हा जल्लोष करण्यात आला. निरभ्र आसमंतात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. बुधवारी एकादशी आणि आज गुरुवार असल्याने बऱ्याच जणांनी शाकाहारी पदार्थांवरच यंदाचा थर्टी फर्स्ट साजरा केला.
अनेक जणांनी कुटुंबीयांसह बाहेरगावी पर्यटनाला जाणे पसंत केले. तर अनेकांनी घरातच मस्त पदार्थांची मेजवानी बनवली.. तर काहींनी हॉटेलमधील पार्सलला प्राधान्य दिले. रात्रीचे १२ वाजले आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मध्यरात्र झाली तरी रस्त्यांवर नागरिकांची गर्दी होती. समाज माध्यमांवर मावळत्या वर्षाला निरोप देणारे व नव्या वर्षाचे स्वागत करणारे मेसेजेस फिरत होते.
रेसिडेन्सीमध्ये जल्लोष
रेसिडेन्सी क्लबमध्ये जल्लोष आणि नृत्य करुन सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत डीजेवर महिला, पुरुषांनी बेभान होवून नृत्य केले. यामध्ये तरुण, तरुणींचा सहभाग मोठ्या संख्येने होता.