पोलिस संरक्षणात कर्नाटक-महाराष्ट्र राज्यातील बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव, दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा
By संदीप आडनाईक | Updated: February 25, 2025 22:07 IST2025-02-25T22:07:18+5:302025-02-25T22:07:59+5:30
Kolhapur News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे दोन्ही राज्यातील बससेवा मंगळवारीही ठप्पच होती. राज्य सरकारने कर्नाटक सरकारकडे प्रत्येक बसमागे पोलिस संरक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

पोलिस संरक्षणात कर्नाटक-महाराष्ट्र राज्यातील बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव, दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा
- संदीप आडनाईक
कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे दोन्ही राज्यातील बससेवा मंगळवारीही ठप्पच होती. राज्य सरकारने कर्नाटक सरकारकडे प्रत्येक बसमागे पोलिस संरक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, कोल्हापूर आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची या परिस्थितीसंदर्भात आणि बससेवा तातडीने सुरु करण्यासंदर्भात मंगळवारी बैठक झाली. दोन्ही राज्यातील बससेवा दोन दिवसांत सुरळीत करण्याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळाच्या चालकास कन्नड भाषा येत नसल्यामुळे दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात मारहाण झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील आंदोलकांनी कर्नाटकातून येणाऱ्या बसेसना काळे फासले. या प्रकारामुळे राज्यात वातावरण तापलेले आहे. महाराष्ट्रातून दरदिवशी सुमारे ८६ बसेस कर्नाटकात जातात आणि कर्नाटकातूनही तितक्याच बसेस महाराष्ट्रात येत असतात. या सर्व बसेस कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर कोगनोळी नाक्यावर रोखलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यादरम्यानची सार्वजनिक बस सेवा ठप्पच आहे. याचा फटका दोन्ही राज्यातील प्रवाशांना बसला आहे.
दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी केली चर्चा
दरम्यान या विषयावर मंगळवारी दुपारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ऑनलाईन चर्चा केली. यात दोन दिवसात बससेवा सुरळीत करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत दोन्ही राज्यांच्या बस गाड्यांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला.