Kolhapur: भोंदू महाराजाच्या टोळीतील महिला पोलिस तृप्ती मुळीक अटकेत, ओरोसमधून घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:49 IST2024-12-12T13:48:36+5:302024-12-12T13:49:00+5:30

कोल्हापूर : करणी केल्याची भीती घालून नागरिकांना लुबाडणाऱ्या भोंदू महाराजाच्या टोळीतील सदस्य पोलिस कॉन्स्टेबल तृप्ती संजय मुळीक (वय ३४, ...

Kolhapur Policewoman Trupti Mulik of Bhondu Maharaja gang arrested, taken into custody from Oros | Kolhapur: भोंदू महाराजाच्या टोळीतील महिला पोलिस तृप्ती मुळीक अटकेत, ओरोसमधून घेतले ताब्यात 

Kolhapur: भोंदू महाराजाच्या टोळीतील महिला पोलिस तृप्ती मुळीक अटकेत, ओरोसमधून घेतले ताब्यात 

कोल्हापूर : करणी केल्याची भीती घालून नागरिकांना लुबाडणाऱ्या भोंदू महाराजाच्या टोळीतील सदस्य पोलिस कॉन्स्टेबल तृप्ती संजय मुळीक (वय ३४, सध्या रा. ओरस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, मूळ रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) हिला अटक झाली. जुना राजवाडा पोलिसांच्या पथकाने बुधवारी (दि. ११) तिला ओरस येथून अटक केली. गंगावेशीतील सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७) यांना करणी काढण्याचे आमिष दाखवून ८४ लाख ७० हजारांची लूट करणाऱ्या टोळीत तिचा समावेश होता.

कोकणातील दादा महाराज पाटणकर याने फिर्यादी कुलकर्णी यांना त्यांच्या कुटुंबावर जवळच्याच एका व्यक्तीने करणी केल्याची भीती घातली. करणी काढण्यासाठी काळी जादू करण्याचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी ३ ऑक्टोबरला गुन्हा दाखल होताच, जुना राजवाडा पोलिसांनी टोळीतील सदस्य शशिकांत नीळकंठ गोळे (वय ६९, रा. बारामती, जि. पुणे) आणि कुंडलिक शंकर झगडे (वय ३८, रा. जेजुरी, जि. पुणे) या दोघांना अटक केली होती.

या गुन्ह्यात एका महिला पोलिस कॉन्स्टेबलचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपास करून संशयित पोलिस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक हिचा पोलिसांनी शोध घेतला. गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने बुधवारी ओरसला जाऊन तिला अटक केली. ती मूळची दरवेश पाडळी येथील असून, तिचे अनेक कारनामे असल्याची परिसरात चर्चा आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

उपमुख्यमंत्र्यांच्या कारचे सारथ्य

तृप्ती मुळीक ही २०११ मध्ये सिंधुदुर्ग पोलिस दलात चालक पदावर भरती झाली. तिने डिसेंबर २०२१ मध्ये सिंधुदुर्गमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कारचे सारथ्य केले होते. त्या घटनेनंतर ती चर्चेत आली होती.

Web Title: Kolhapur Policewoman Trupti Mulik of Bhondu Maharaja gang arrested, taken into custody from Oros

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.