मर्डर फिक्स २०२५, कोल्हापूरचा बाप; आक्षेपार्ह रिल्स, स्टेटसवरून शाहूपुरी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:10 IST2025-11-04T18:10:07+5:302025-11-04T18:10:25+5:30
रुबाब केला तिथेच उठाबशा काढल्या

मर्डर फिक्स २०२५, कोल्हापूरचा बाप; आक्षेपार्ह रिल्स, स्टेटसवरून शाहूपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : मर्डर फिक्स २०२५, कोल्हापूरचा बाप... अशा मजकुराचा आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारे आणि रिल्स व्हायरल करणाऱ्या सहाजणांवर शाहूपुरी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. एरव्ही नागाळा पार्क येथील विवेकानंद कॉलेजबाहेर रुबाबात फिरणाऱ्या या टोळक्याला त्याच ठिकाणी उठाबशा काढायला लावून पोलिसांनी त्यांचा रुबाब उतरविला. ही कारवाई सोमवारी (दि. ३) दुपारी केली.
विशाल ऊर्फ सर्किट अनिल साळुंखे (वय ३३, रा. महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर), ओमकार दादा साबळे (२३, रा. भाजी मंडई, कसबा बावडा), रूपेश सुनील काशिद (२६, रा. कृष्णानंद कॉलनी, कसबा बावडा), भार्गव राहुल भोसले (२२, रा. रंकाळा टॉवर), वैभव विष्णू सूर्यवंशी (२९, रा. शाहू मिल चौक) आणि आर्यन दीपक मोरे (१९, रा. संकपाळ नगर, कसबा बावडा) अशी कारवाई केलेल्या तरुणांची नावे आहेत.
विवेकानंद कॉलेजशी काही संबंध नसताना ते रोज या परिसरात रुबाबात वावरत होते. व्हॉट्सॲप, इन्स्टाच्या स्टेटसला आक्षेपार्ह मजकूर आणि रिल्स ठेवून ते दहशत माजवीत होते. मर्डर फिक्स २०२५ या रिल्समुळे ते पोलिसांच्या नजरेत आले.
शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी सर्व संशयित तरुणांना पकडून नागाळा पार्क परिसरातून त्यांची वरात काढली. ज्या रस्त्यांवरून ते रुबाबात फिरत होते, तिथेच त्यांना उठा-बशा काढायला लावून त्यांचा रुबाब उतरविला. पोलिसांच्या कारवाईनंतर तरुणांनी पुन्हा आक्षेपार्ह रिल्स तयार करणार नाही आणि स्टेटसला ठेवणार नाही अशी कबुली दिली.