प्रशांत कोरटकरचा मोबाइल कोल्हापूर पोलिसांना मिळाला, तपासाला येणार गती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:14 IST2025-03-06T12:13:39+5:302025-03-06T12:14:04+5:30
आज फॉरेन्सिक अधिकाऱ्यांकडे देणार

प्रशांत कोरटकरचा मोबाइल कोल्हापूर पोलिसांना मिळाला, तपासाला येणार गती
कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर याचा मोबाइल आणि सीमकार्ड नागपूर सायबर पोलिसांनी बुधवारी (दि. ५) जुना राजवाडा पोलिसांकडे सादर केले. इनकॅमेरा पंचनामा करून पोलिसांनी मोबाइल आणि सीमकार्ड ताब्यात घेतले. आवाजाच्या तपासणीसाठी दोन्ही वस्तू गुरुवारी फॉरेन्सिक अधिकाऱ्यांकडे दिल्या जाणार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून कोरटकर याने इतिहास संशोधक सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत सावंत यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, नागपूर पोलिसांकडेही एक फिर्याद दाखल झाली होती.
कोरटकर याने अटकपूर्व जामिनासाठी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात धाव घेतल्यानंतर तपासासाठी त्याचा मोबाइल आणि सीमकार्ड पोलिस ठाण्यात जमा करण्याची सूचना न्यायालयाने दिली होती. त्यानुसार कोरटकर याच्या पत्नीने त्याचा मोबाइल आणि सीमकार्ड नागपूर सायबर पोलिसांकडे सादर केले होते. नागपूर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी या दोन्ही वस्तू जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिल्या. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी सरकारी पंचांच्या उपस्थितीत इनकॅमेरा पंचनामा करून मोबाइल, सीमकार्ड जमा करून घेतले.
फॉरेन्सिककडून होणार तपासणी
फिर्यादी सावंत यांचा मोबाइल पोलिसांनी आठवड्यापूर्वीच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे. आता कोरटकरचा मोबाइल तपासासाठी पाठवला जाणार आहे. दोन्ही मोबाइलमधील संभाषणाची ध्वनिफित तपासून हा आवाज सावंत आणि कोरटकर यांचाच आहे काय, याची तपासणी केली जाणार आहे. तपासणीचा अहवाल लवकरात लवकर मिळावा, यासाठी फॉरेन्सिक अधिकाऱ्यांना विनंती केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मंगळवारी न्यायालयात म्हणणे मांडणार
न्यायालयाने कोरटकर याला ११ मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. ११ मार्चला होणाऱ्या सुनावणीत पोलिस त्यांचे म्हणणे सादर करणार आहेत. कोरटकर याला अटक करून त्याची चौकशी करता यावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.