उद्धव गोडसेकोल्हापूर : वाढदिवसाच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापल्याबद्दल महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज, शनिवारी (दि. २६) तक्रार दिली असून, क्षीरसागर यांना अटक करण्याची मागणी केली आहे.राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. २४) जल्लोषात साजरा झाला. त्यावेळी शनिवार पेठेतील घराबाहेर क्षीरसागर यांनी तलवारीने केक कापला. यावर उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. क्षीरसागर यांनी सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्राने केक कापून दहशत माजवण्यासह गुन्हेगारीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप रविकिरण इंगवले यांनी केला आहे.क्षीरसागर यांच्या आक्षेपार्ह आणि बेकायेदशीर कृतीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. आर्म ॲक्टचे उल्लंघन करण्याबरोबरच क्षीरसागर यांनी शहरात विनापरवाना फलक आणि कमानी लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याचीही तक्रार इंगवले यांनी केली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल क्षीरसागर यांना अटक करावी, अशी मागणी इंगवले यांनी अर्जाद्वारे केली आहे. इंगवले यांच्या अर्जामुळे कोल्हापुरात शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
वाढदिवसाचा केक तलवारीने कापला, राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षांविरोधात कोल्हापूर पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 14:40 IST