कट मेरठच्या जेलमध्ये.. चोऱ्या कोल्हापुरात; सराईत आंतरराज्यीय टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:14 IST2025-07-28T17:12:57+5:302025-07-28T17:14:06+5:30
सात गुन्ह्यांचा उलगडा, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

कट मेरठच्या जेलमध्ये.. चोऱ्या कोल्हापुरात; सराईत आंतरराज्यीय टोळी गजाआड
कोल्हापूर : चोरीच्या गुन्ह्यात मेरठ (उत्तर प्रदेश) येथील जेलमध्ये शिक्षा भोगताना चोरट्यांनी कट रचला आणि सुटका होताच कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला. बीएसएनलच्या मोबाइल टॉवरची बॅटरी आणि शेतकऱ्यांचे सोलर पंप चोरून भंगारात घालणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून सात गुन्ह्यांचा उलगडा करून चोरीतील सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. २६) सायंकाळी कसबा बावडा ते शिये रोडवर ही कारवाई केली.
दत्ता बाळू गावडे (वय ३२, रा. गोंदी, ता. आटपाडी, जि. सांगली), प्रीतेश गिरीष पुजारी (३५, रा. गुजरवाडी, कात्रज, पुणे) आणि साकिब साबिर मलिक (३५, सध्या रा. शाहूपुरी, चौथी गल्ली, मूळ रा. मेरठ, उत्तर प्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील चौथा आरोपी इम्रान अन्सारी (रा. मेरठ) याचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपासाची माहिती दिली.
जिल्ह्यात झालेल्या बॅटरी आणि सोलर पंप चोरीच्या घटनांमध्ये सांगली जिल्ह्यातील सराईत चोरटा दत्ता गावडे याचा सहभाग असल्याची माहिती अंमलदार हिंदुराव केसरे आणि विजय इंगळे यांना मिळाली होती. दोन्ही संशयित चोरीतील मुद्देमाल विकण्यासाठी कसबा बावडामार्गे शाहूपुरीत जाणार असल्याचे समजताच शिये फाटा ते बावडा मार्गावर सापळा रचून संशयित कार अडवली. त्यातील गावडे आणि त्याचा साथीदार प्रीतेश पुजारी याला अटक केली.
त्यांच्या चौकशीत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या सात गुन्ह्यांचा उलगडा झाला. चोरीतील मुद्देमाल शाहूपुरी येथील साकिब मलिक याच्याकडे भंगारात घातल्याची कबुली दोघांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी मलिक याला अटक करून चोरीतील बॅटरींसह सोलर पंपांच्या प्लेटा जप्त केल्या. उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.
पाच महिन्यांपूर्वी सुटका
गावडे आणि प्रीतेश पुजारी हे दोघे चोरीच्या गुन्ह्यात मेरठ येथील जेलमध्ये होते. त्यावेळी इम्रान अन्सारी आणि साकीब मलिक यांच्याशी ओळख झाली. तिथेच त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात चो-या करण्याचा कट रचला. त्यानुसार पाच महिन्यांपूर्वी सुटका होताच ते कोल्हापुरात पोहोचले. दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळी त्यांनी चोऱ्या केल्या. त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.